भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी सगळे नाट्य घडले. एकाच दिवसात तीन डाव खेळले गेले आणि त्यात दोन्ही संघांचे मिळून २३ फलंदाज माघारी परतले. त्यामुळे कदाचित ही कसोटी दुसऱ्याच दिवशी संपणार की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव पुरता निष्प्रभ ठरला. त्यांचे सगळे फलंदाज अवघ्या ५५ धावांतच माघारी परतले. ही नीचांकी धावसंख्या गाठण्यास त्यांना प्रवृत्त केले ते मोहम्मद सिराजने. त्याने ९ षटकांत १५ धावा देत दक्षिण आफ्रिकेचे ६ फलंदाज टिपले.
भारताने एकही धाव न घेता गमावले ६ फलंदाज
अवघ्या २३.२ षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा डाव आटोपला. त्यामुळे भारताची बाजू चांगलीच वरचढ ठरू लागली. भारताने या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना आपल्या पहिल्या डावात ४ बाद १५३ धावा केल्या होत्या. पण भारतीय फलंदाजांनीही दक्षिण आफ्रिकेचा आदर्श समोर ठेवत सगळी अस्त्र जमिनीवर ठेवली. ४ बाद १५३ या स्थितीतून भारत सर्वबाद १५३ अशा स्थितीत कधी पोहोचला हे पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही कळले नाही. एकही धावेची भर न घालता भारताचे सहा फलंदाज दोन षटकांत माघारी परतले. त्यात एनगिडीने टाकलेल्या ३४व्या षटकात प्रथम के.एल. राहुलला टिपले. त्याने ८ धावा केल्या. एनगिडीने टाकलेल्या उसळत्या चेंडूंवर अप्पर कट मारण्याच्या प्रयत्नात राहुलने यष्टिरक्षकाकडे चेंडू देऊन बाद झाला. एनगिडीने पहिल्याच चेंडूंवर यश मिळविले पण नंतर तिसऱ्या चेंडूंवर रवींद्र जाडेजाचा खेळ संपुष्टात आला. उसळत्या चेंडूला सोडण्याच्या प्रयत्नात जाडेजा खाली बसला पण त्याच्या ग्लव्हजना चेंडू स्पर्श करून गलीतल्या जॅनसेनच्या हाती विसावला.
हे ही वाचा:
कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्ता आशाने ३ शावकांना दिला जन्म!
गुरुग्राममध्ये मॉडेलची हत्या, बीएमडब्ल्यूमध्ये मृतदेह घालून आरोपी पळाले!
ओडिशाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार!
केपटाऊनच्या मैदानात ‘राम सिया राम’ गाणं वाजताच विराट कोहलीने जोडले हात
पाचव्या चेंडूंवर जसप्रीत बुमराह बाद झाला. हे कमी की काय, पुढच्या रबाडाच्या षटकात घसरगुंडीची परंपरा कायम राहिली. दुसऱ्या चेंडूने विराटच्या बॅटची कड घेतली आणि दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या मार्करमच्या हाती चेंडू गेला. विराटने भारतीयांपैकी ४६ धावांची सर्वोच्च खेळी केली. चौथ्या चेंडूंवर सिराज धावचीत झाला. प्रसिद्ध कृष्णाला टाकलेल्या चेंडूंवर धाव घेण्याच्या प्रयत्नात आणखी फलंदाज भारताने गमावला. पुढच्या चेंडूंवर प्रसिद्ध कृष्णाही बाद झाला. एक धावही न जमा करता भारताने सहा फलंदाज गमावले.
त्याआधी, मोहम्मद सिराजने मात्र बळींचा षटकार नोंदवित दक्षिण आफ्रिकेला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. कसोटी क्रिकेटमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात ३ बाद ६२ धावा केल्या आहेत. सलामीवीर ऐडन मार्करम ३६ धावांवर खेळत असून डेव्हिड बेन्डिंगहॅम ७ धावांवर नाबाद आहे. पहिल्या कसोटीती शतकवीर एल्गर मात्र १२ धावांवर माघारी परतला.