प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के यांचे मंगळवार, ३१ मे रोजी निधन झाले. कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या ५३ व्या वर्षी के के यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
के के कोलकाता येथील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गात असतानच त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे ते त्यांच्या हॉटेल रुममध्ये परतले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.
बुधवार, १ जून सकाळी त्यांची पत्नी आणि मुले कोलकात्यामध्ये दाखल होणार आहेत. मागील दोन दिवसांत के के यांनी कोलकात्यात दोन कॉन्सर्ट केले होते.
भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायकांपैकी केके एक आहेत. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. के के हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. ‘खुदा जाने’, ‘इट्स द टाइम टू डिस्को’, ‘कोई कहे कहता रहे’, ‘तडप तडप के इस दिल से’ यासारखी अनेक हिट गाणी के के यांनी दिली आहेत.
हे ही वाचा:
पीएफआयने केला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान
तंबाखूमुळे प्रतिवर्षी १० लाख मृत्यू
कॅनडामध्ये पिस्तूल व्यापार मर्यादित करण्यासाठी नवीन विधेयक
काँग्रेसच्या आशिष देशमुख यांनी चिडून दिला राजीनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही के के यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के यांच्या अकाली निधनाने धक्का बसला आहे. त्यांच्या गाण्यांमधून अपार भावना प्रदर्शित व्हायच्या. सर्व वयोगटातील लोकांमध्ये त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून ते नेहमी आपल्यामध्येच असतील, त्यांच्या आठवणी आपल्यासोबत राहतील. के के यांच्या कुटुंबाच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सामील आहे.”