आपल्या करुणामय वाणीने आणि काव्याने सर्वांना प्रभावित करणाऱ्या पद्मश्री सिंधुताई सकपाळ यांनी आपल्या संस्थेसाठी देशभर भ्रमण केले. त्या भ्रमंतीतून आपल्या संस्थेसाठी निधी गोळा केला. परदेशातूनही निधी मिळावा आणि त्यातून संस्थेचे कार्य अधिक विस्तारावे यासाठीही त्यांनी अथक प्रयत्न केले. सिंधुताई यांच्या जाण्याने या त्यांच्या कार्याची मोठी हानी झाली आहे. अर्थात हे कार्य यापुढेही तेवढेच जोमाने सुरू राहणार आहे.
विविध सामाजिक संस्थांची स्थापना सिंधुताईंनी केली. सासर सोडल्यानंतर त्यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी व त्यांच्या जीवनप्रवासात प्रकाश निर्माण करण्यासाठी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेत शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल करत त्यांनी अनाथांची माय म्हणून मुलांना आधार दिला. या संस्थेप्रमाणेच बाल निकेतन हडपसर, पुणे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतीगृह, गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा, सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था, अभिमान बाल भवन अशा संस्थांची स्थापना त्यांनी केली.
हे ही वाचा:
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
मुस्लिम लॉ बोर्ड म्हणते, सूर्यनमस्कार असंवैधानिक!
जागा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीलाच कंद यांनी दाखविली जागा
‘बुल्ली बाई’ प्रकरणातील मास्टरमाईंड होती एक महिला?
सिंधुताईंचा जन्म म्हणजेच १४ नोव्हेंबर हा बालदिन. त्यांचा अनाथ आणि निराधार मुलांप्रती असलेली आपुलकी हा त्यामुळेच एक योगायोग म्हणता येईल. त्यांचे जीवन संघर्षमय असेच होते. घरच्यांना मुलगी नको असल्यामुळे त्यांचे नाव चिंधी असे ठेवण्यात आले. गरिबीमुळे सिंधुताई यांचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले आणि वयाच्या नवव्या वर्षीच त्यांना बोहल्यावर चढविण्यात आले. त्यांचे पती श्रीहरी सपकाळ हे त्यांच्यापेक्षा तब्बल २६ वर्षांनी मोठे होते. वयाच्या १८व्या वर्षीच त्या समाजकारणाकडे वळल्या. गुरे राखणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांना न्याय मिळवून दिला. काम करूनही मजुरी मिळत नसल्याने त्यांनी या महिलांसाठी झगडा केला. त्याला यशही आले.
सिंधुताई यांच्या या संघर्षमय जीवनावर आधारित मी सिंधुताई सकपाळ हा चित्रपट आला होता. अभिनेत्री तेजस्विनी पंडितने त्यात मुख्य भूमिका साकारली होती. सिंधुताईंच्या जाण्याने आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया तेजस्विनीने व्यक्त केली आहे. आपण सिंधुताईंच्या मुलीच्या संपर्कात होतो आणि तिच्याकडून माईची ख्यालीखुशाली कळत असे पण त्या अचानक सगळ्यांना सोडून जातील असे वाटले नव्हते, असे तेजस्विनी म्हणाली.