पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने रौप्य पदकाची कमाई केली आहे. यामुळे यंदाच्या वर्षीचे पहिले रौप्यपदक भारताच्या खात्यात जमा झाले आहे. तर, भारताला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण पाच पदके मिळाली आहेत. नीरज याने भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ८९.४५ मीटरवर भाला फेकला. तर, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक पटकावले.
टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या नीरजचे यंदा थोडक्यासाठी सुवर्ण पदक हुकले. मात्र रौप्यपदक मिळाल्यानंतरही नीरज याचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. दरम्यान नीरजच्या पालकांचीही प्रतिक्रिया समोर आली. विशेष चर्चा आहे ती नीरज चोप्राच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेची. त्यांनी आपल्या मुलाच्या रौप्यपदकाबद्दल आनंद व्यक्त करत असताना पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दलही भाष्य केले.
नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर त्याची आई सरोज देवी एएनआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना म्हणाल्या, नीरजला रौप्यपदक मिळाले असले तरी आम्ही खूप आनंदी आहोत. हे ही सुवर्णपदक मिळण्यासारखेच आहे. तो जखमी होता, तरीही त्याने चांगली कामगिरी केली, याबद्दल आम्हाला आनंद आहे. तसेच पाकिस्तानच्या नदीमने सुवर्णपदक जिंकले, त्याबद्दलही आनंद वाटतो. सर्वच खेळाडू मला मुलासारखे आहेत.
हे ही वाचा:
कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक
काकांची पुंगी निघाली नागोबा डूलाया लागला
‘नीरज चोप्रा म्हणजे उत्कृष्टतेचे मूर्तिमंत रूप’
मद्य धोरण घोटाळा प्रकरणात मनीष सिसोदियांना १७ महिन्यानंतर जामीन
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राकडून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा सुवर्ण पदक जिंकण्याची भारतीयांची अपेक्षा होती. यावेळी त्याचे सुवर्ण पदक काही मीटर्सने हुकले. त्याने दमदार कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. फायनलमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने बाजी मारली. अर्शद नदीमने ९२.९७ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्ण पदक मिळवलं. सोबत नवीन ऑलिम्पिक रेकॉर्डही रचला. नीरजने फायनलमध्ये ८९.४५ मीटर अंतरापर्यंत थ्रो केला. रौप्य पदक विजेती कामगिरी केल्यानंतर नीरजने अजून आपलं सर्वोत्तम प्रदर्शन बाकी असल्याच सांगितलं.