आशियाई स्पर्धेमध्ये भारताने १८ व्या पदकाची कमाई करत खेळाडूंनी आपली दमदार कामगिरी सुरूचं ठेवली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामराने सुवर्णपदक पटकावलं आहे. तर, भारताची नेमबाज आशी चौक्सी हिने कांस्यपदक मिळवले आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात पाच सुवर्ण, पाच रौप्य आणि आठ कांस्य पदके अशी एकूण १८ पदके आहेत.
भारताची नेमबाज सिफ्ट कौर सामरा हिने महिलांच्या ५० मीटर रायफल 3p प्रकारात वैयक्तिक सुवर्ण जिंकले. तर, आशी चौक्सी हिने कांस्य पदक पटकावले आहे. याआधी नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती.
सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वलस्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग होती. तिसऱ्या स्थानी ४३७.८ गुणांसह आशी चौक्सी आहे.
नेमबाज मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम संगवान यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तुल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. मनू भाकर हिने तिच्या तिसर्या शॉट्स सिरीजच्या रॅपिड राऊंडमध्ये ९८ शूट केले. यात तिने ५९० गुणांसह अंतिम फेरीत अव्वल स्थान पटकावले. ५८६ गुणांसह ईशा सिंग आणि ५८३ गुणांसह रिदम सांगवानही अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या होत्या. सांघिक स्पर्धेत मनू भाकर, ईशा सिंग आणि रिदम सांगवान यांनी १ हजार ७५९ गुणांसह सुवर्ण कामगिरी केली.
हे ही वाचा:
ठरलं! २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना
आशियाई स्पर्धेत नेमबाजांचा ‘सुवर्ण’वेध
एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा
नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा
याआधी दिव्यांश सिंग पनवार, रुद्रांक्ष पाटील, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांच्या संघाने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल गटात सुवर्णपदक पटकावले होते. तर महिलांच्या १० मीटर एअर रायफल संघात मेहुली घोष, रमिता जिंदाल आणि आशी चौक्सी यांनी रौप्यपदक मिळवले. रमिताने महिलांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेत कांस्यपदकही मिळवले. ऐश्वरीने पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते. पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर पिस्तूलमध्ये आदर्श सिंग, विजयवीर सिद्धू आणि अनिश भानवाला या तिघांनीही कांस्यपदक पटकावले.