अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

अभिनेता सिद्धार्थने सायनापुढे मान्य केला पराभव

हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांत काम करणारा अभिनेता सिद्धार्थ याने अखेर बॅडमिंटनपटू सायना नेहवालपुढे पराभव मान्य केला आहे. सायनाने पंजाबमधील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील दिरंगाईबाबत केलेल्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सिद्धार्थने पातळी ओलांडली होती. त्यावरून त्याला सोशल मीडियावर सायनाच्या चाहत्यांनी आणि एकूणच नेटकऱ्यांनी चांगलेच झोडपून काढले. आता त्याने सायनाची माफी मागितली आहे.

सिद्धार्थच्या या ट्विटची महिला आयोगानेही दखल घेतली होती. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सिद्धार्थ अशी वक्तव्ये करून महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतो आहे, अशी टिप्पणी केली होती.

सिद्धार्थने ट्विट करत सायनाची माफी मागितली आहे. त्यात तो म्हणतो की, तुझ्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना मी बोचणारा विनोद केला. अनेक बाबतीत मी तुझ्याशी असहमत असेनही पण तुझे ट्विट वाचल्यावर माझी राग व्यक्त करण्याची पद्धत चुकीची होती. यापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होण्याची क्षमता माझ्यात आहे.

विनोदाचा विचार करता जर तो विनोद काय आहे, हे स्पष्ट करावे लागत असेल तर त्या विनोदात अर्थ नाही. त्यामुळे मी केलेल्या या विनोदाबद्दल माफी मागतो.

मी स्त्रीवादी आहे. त्यामुळे मी तुझ्यावर ट्विट करताना कुठेही स्त्री म्हणून तुला वेदना होतील असे काहीही म्हटलेले नाही. आता जे झाले ते तू विसरून जावेस आणि माझी माफी स्वीकारावीस अशी अपेक्षा. तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन असशील.

सायनाने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या बाबत पंजाब सरकारने जो हलगर्जीपणा दाखविला त्याविरोधात ट्विट केले होते आणि पंतप्रधानांसारख्या व्यक्तीच्या बाबतीत अशी दिरंगाई कशी काय केली जाते, असा सवाल उपस्थित केला होता.

Exit mobile version