विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीत शुभमन गिल चमकला. त्याने आपले तिसरे कसोटी शतक ठोकताना भारताला आश्वासक धावसंख्या गाठून दिली.
कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करत असलेल्या शुभमनला यावेळी मात्र सूर सापडला. पहिल्या डावात त्याला ३४ धावांचीच खेळी करता आली होती. यावेळी मात्र त्याचे नशीब फळफळले. सलामीची फलंदाज निराशाजनक खेळ करत बाद झाल्यानंतर शुभमनने डावाला आकार दिला. यावेळीही भारताच्या अन्य फलंदाजांपैकी कुणीही अर्धशतकी खेळी केली नाही. पहिल्या डावात २०९ धावांची खेळी करणाऱ्या यशस्वी जयस्वालमुळे भारताला ३९६ धावांपर्यंत मजल मारता आली होती. त्यात अन्य कोणत्याही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नव्हती.
पहिल्या डावात भारताने १४३ धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारताचा खेळ २५५ धावांत आटोपला. त्यामुळे एकूण ३९९ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर होते. इंग्लंडच्या पहिल्या डावात चमकला तो भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह. त्याने ४५ धावांत ६ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला लगाम घातला. त्यामुळे झॅक क्रॉलीचा (७६) अपवाद वगळता कुणाही फलंदाजाला अर्धशतकही झळकावता आले नाही. त्यामुळे त्यांचा डाव केवळ २५३ धावांपर्यंतच पोहोचू शकला.
हे ही वाचा:
आमदार गणपत गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!
धुळ्यात गुटखा तस्करांवर मोठी कारवाई, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त!
लडाखमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले!
भावनगरमध्ये एकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार
त्यामुळे अर्थातच भारताची बाजू भक्कम ठरली. १४३ धावांच्या आघाडीसह भारत मजबूत स्थितीत असला तरीही भारतीय सलामीवीरांना सूर सापडला नाही. यशस्वी जयस्वाल १७ तर रोहित शर्मा १३ धावांवर परतले. तिसऱ्या क्रमांकावरच्या शुभमनने १०४ धावांची खेळी केली. त्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या डावात अक्षर पटेलने ४५ धावांची खेळी केली. मात्र ती वगळता एकाही फलंदाजाला ३० धावाही करता आल्या नाहीत.
भारताचे शेवटचे तीन फलंदाज भोपळाही न फोडता माघारी परतले. आता या सामन्याचे आणखी दोन दिवस शिल्लक असून इंग्लंडने १ बाद ६७ अशी कामगिरी केली आहे. झॅक क्रॉली २९ धावांवर तर रेहान अहमद ९ धावांवर नाबाद आहेत.