केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत शुभम कुमार अव्वल

देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत शुभम कुमार हा देशात प्रथम आला आहे. आयआयटी मुंबई येथून शिक्षण पूर्ण करून बी. टेक सिव्हिल इंजिनियर झालेल्या शुभमने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग दुसऱ्या वर्षी यश संपादन केले आहे. तर जागृती अवस्थी हिचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. मुलींमध्ये जागृती ही अव्वल ठरली आहे. जागृती हिने भोपाळ येथील एमएएनआयटी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.

या दोघां पाठोपाठ अंकिता जैन ही विद्यार्थिनी देशात तिसरी आली आहे. तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान मृणाली जोशी या विद्यार्थिनीने पटकावला आहे. ती देशात ३६ वी आहे.

हे ही वाचा:

देवी पावली…अखेर महाराष्ट्रातील मंदिरे उघडणार

…म्हणून अमिताभ बच्चन यांनी लावला रोहित शर्माला व्हिडिओ कॉल

४ ऑक्टोबरपासून शाळांमध्ये होणार किलबिलाट

भारताशी संबंध दृढ करण्यातच अमेरिका आणि फ्रान्सचे हित

या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकूण ७६१ विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. ज्यापैकी ५४५ पुरुष तर २१६ महिला आहेत तर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वोत्तम २५ परीक्षार्थींमध्ये १३ पुरुष तर १२ महिला आहेत. तर निवडलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल २५ विद्यार्थी हे दिव्यांग आहेत.

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही तीन टप्प्यात होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे या परीक्षेचे तीन टप्पे असतात. या वर्षी परीक्षेला तब्बल १०,४०,०६० परीक्षार्थींनी आवेदन भरले होते. तर ४,८२,७७० प्रत्यक्ष परीक्षेला बसले. त्यापैकी १०,५६४ विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरले. तर २०५३ जण मुलाखतीसाठी निवडले गेले होते.

Exit mobile version