२२ जानेवारीला अयोध्येत प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.देशभरात सोहळ्याची चर्चा असून राम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाबाबत अनेकांना उत्सुकता आहे. आनंदाच्या या क्षणी रामनगरी अयोध्येत दिवे लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे. काही लोक घरी रामज्योती किंवा दिवा लावून उत्सव साजरा करतील. त्याचप्रमाणे मुस्लीम महिलाही अयोध्येतून काशीला रामज्योत आणणार असून काशीतही लाखो दिवे लावून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे.
काशी मधून मुस्लिम महिलांचा समूह रामनामाची अखंड ज्योत घेऊन अयोध्येकडे रवाना झाला आहे.भगवी वस्त्रे परिधान करून महिलांनी हा प्रवास सुरु केला आहे.या मुस्लिम महिला अयोध्येला पोहचतील आणि राम ज्योती प्रज्वलित करतील आणि त्यानंतर ती ज्योत घेऊन काशीला परततील.२२ जानेवारी रोजी या ज्योतीने मुस्लिमांच्या घरातही दिवे लावले जाणार आहेत. रामभक्त डॉ.नाजनीन अन्सारी आणि डॉ. नजमा परवीन यांनी ही जबाबदारी घेतली आहे.
हे ही वाचा:
मामाशी असलेल्या वैमनस्यातून मोहोळचा झाला ‘गेम’
मध्यप्रदेशात बालगृहातून २६ मुली बेपत्ता; धर्मांतर केल्याची भीती!
अवघ्या १० दिवसांत अंबती रायुडू वायएसआर काँग्रेसमधून ‘आऊट’!
पन्हाळ्याच्या शेजारी पावनगडावरील बेकायदेशीर मदरसा केला जमीनदोस्त
२२ जानेवारी रोजी उद्घाटनाच्या दिवशी अयोध्येसह काशीलाही उजळवून टाकू अशी शपथ त्यांनी घेतली आहे.नाजनीन अन्सारी या मुस्लिम महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत.पंतप्रधान मोदींच्या आव्हानानंतर त्यांनी हा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकाशाच्या माध्यमातून अन्सारी काशीतील मुस्लिमांना २२ जानेवारीला हा सण साजरा करण्याचे आवाहन करणार आहेत. नाजनीन अन्सारी मानतात की, सर्व भारतीय श्री रामांचे वंशज आहेत आणि कोणत्याही भारतीयाचा डीएनए वेगळा नाही. नाजनीन आणि नजमा यांच्या या प्रवासाला काशीचे डोमराज ओम चौधरी आणि पातालपूरी मठाचे महंत बालक दास यांनी हिरवा झेंडा दाखवला.अयोध्येत महंत शंभू देवाचार्य या महिलांना ज्योत सुपूर्द करणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी यात्रेला सुरुवात करून रविवारी त्या राम ज्योतीसोबत काशीला येणार आहेत.अयोध्येची पवित्र माती आणि सरयू नदीचे पाणी घेऊन त्या काशीला पोचणार आहेत.काशीला परतताना जौनपूरमध्ये अनेक मुस्लिम कुटुंबे त्यांचे स्वागत करतील. काशीमध्ये या रामज्योतीने १५० मुस्लिम दिवे लावतील.दरम्यान, २००६ मध्ये संकटमोचन हनुमान मंदिरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर डॉ. नाजनीन अन्सारी आणि डॉ. नजमा परवीन यांनी काशीमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी ७० मुस्लिम महिलांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आणि त्या वेळी त्यांनी या मुस्लिम महिलांसोबत हनुमान चालिसाचे पठण केले होते. तेव्हापासून आजही दरवर्षी रामनवमी आणि दिवाळीला ते १०० मुस्लिम महिलांसोबत श्री रामाची आरती करतात.