श्रेयस अय्यरची वनडे क्रिकेटमधील दुसरी शतकी खेळी आणि इशान किशनच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम झंझावाती ९३ धावा या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ७ विकेटसनी विजय मिळविला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली.
रांचीच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताची स्थिती २ बाद ४८ अशी होती. सलामीवीर शिखर धवन आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (नाबाद ११३) आणि इशान किशन (९३) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १६१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे भारताने २५ चेंडू राखून विजय मिळविला.
त्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामच्या ७९ धावा आणि रीझा हेन्ड्रिक्सच्या ७४ धावांच्या बळावर त्यांनी ५० षटकांत ७ बाद २७८ धावा केल्या. भारताच्या मोहम्मद सिराजने ३८ धावा देत ३ बळी घेतले. तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. दक्षिण आफ्रिकेचा हंगामी कर्णधार केश महाराज याने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी तीन चिन्ह पाठवली आयोगाकडे
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शेअर बाजारात गुंतवणुकीला बहर
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. त्यातच भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असल्यामुळे दवाचा फटका दक्षिण आफ्रिकेला बसला. नॉर्ते आणि मार्कराम यांना सूर गवसला नाही तर एनगिडीची अनुपस्थिती दक्षिण आफ्रिकेला जाणवली. त्याच्या जागी नॉर्तेला संधी देण्यात आली होती.
तिकडे भारताच्या सिराजने चमकदार कामगिरी केली. पहिल्या वनडेत भारताकडे पाच गोलंदाज होते पण यावेळी सहा गोलंदाजांसह भारतीय संघ खेळला आणि त्याचा फायदा झाला.
स्कोअरबोर्ड
दक्षिण आफ्रिका ७ बाद २७८ (मार्कराम ७९, हेन्ड्रिक्स ७४, डेव्हिड मिलर ना. ३५, मोहम्मद सिराज ३८-३) पराभूत वि. भारत ३ बाद २८२ (श्रेयस अय्यर ना. ११३, इशान किशन ९३).