कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य सरकारने काही राज्यांमधील निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबईत रात्री १० वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र निर्बंध शिथिलीकरणानंतरही शॉपिंग मॉल सुरू करण्यास परवानगी नसल्यामुळे विक्रेते नाराजी व्यक्त करत आहेत. दुकाने खुली ठेवण्याच्या निर्णयामुळे किरकोळ विक्रेत्यांना दिलासा मिळाला असला तरी मॉलमधील हजारो विक्रेते आणि कर्मचारी नाराज आहेत.
एकीकडे महाराष्ट्र वगळता देशातील इतर अनेक राज्यांनी निर्बंध शिथिल केल्यानंतर मॉल उघडण्याची परवानगी दिली आहे. तशीच परवानगी राज्य सरकारनेही द्यावी आणि परवानगी दिल्यास सामाजिक अंतर आणि सुरक्षिततेची काळजी मॉल व्यवस्थापनाकडून घेण्यात येईल असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले. हजारो विक्रेते आणि कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे हा मुद्दाही रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने समोर आणला आहे.
शॉपिंग मॉलमधून सरकारला मोठा कर मिळत असतो. राज्यातील मॉलमधून ४० हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असते. दोन लाख नागरिकांना रोजगार मिळतो. या सर्वांचे भवितव्य आता सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे असे रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सांगितले.