कोरोना नियमांचे पालन करून दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी ठाकरे सरकारकडे व्यापारी वर्गाने मागितली. परंतु ठाकरे सरकार मात्र निर्बंध न हटवण्याच्याच मनःस्थितीत आहे. अखेर व्यापारी वर्गाने ठाकरे सरकारविरूद्ध आता ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. यापुढे शासनाने परवानगी दिली नाही तर, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आता व्यापारी वर्गाने ठाकरे सरकारला दिलेला आहे.
गेले दीड वर्षे आपण कोरोना या महामारीसोबत लढतोय. त्यामुळेच आता आपणही कोरोनासोबत जगायला शिकलोय. कोरोनामहामारीच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीही करण्यात आली. सर्वात जास्त टाळेबंदी ही महाराष्ट्रात झालेली आहे, तरीही सर्वाधिक मृत्यू एकट्या महाराष्ट्राने पाहिलेत. सरकार जनमानसावर अशा पद्धतीने निर्बंध लावून सामान्य नागरिकाच्या सहनशीलतेचा आता अंत पाहात आहे. व्यापारी वर्ग तर या निर्बंधांना अक्षरशः आता कंटाळलेला आहे. तेव्हा दुकानांची वेळ वाढवून द्या, निर्बंध शिथिल करा अशी मागणी व्यापारी सेलचे मितेश शहा यांनी केली आहे. सरकारचे जाचक निर्बंध व्यापारी वर्गाच्या जीवावर उठलेले आहेत. व्यापारी वर्गाला कोरोनाची भीती नाही तर, धंदा बुडीत निघाला त्याची भीती वाटत आहे. आमदार संजय केळकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनीही या आंदोलनात उपस्थित राहात व्यापाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला.
हे ही वाचा:
लोकमान्य टिळक यांच्या आठवणी आणि अख्यायिका
चिपळूणमध्ये ऑक्सिजन अभावी ८ रुग्णांचा मृत्यू
डोंगरउतारावरील झोपड्यांवर सर्वाधिक धोक्याचे सावट
अफगाणिस्तानने ‘असा’ केला पाकिस्तानचा अपमान
एकीकडे ऑनलाईन व्यवसायांना परवानगी आहे, मग व्यापारी वर्गाने काय घोडे मारले आहे, अशीच विचारणा आता व्यापारी करत आहेत. तसेच सद्यस्थितीमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक धंदे मेटाकुटीस आलेले आहेत. असे असले तरी, ठाकरे सरकार मात्र निर्बंधांची मालिका काही बंद करत नाही. त्यामुळेच आता व्यापारी वर्ग हतबल झालेला आहे. हाताशी आलेल्या पैशाला न्याय मिळत नाही. कामगार वर्गाला पगार देताना व्यापारीवर्गाच्या नाकीनऊ आलेले आहेत.
व्यापारी वर्ग या निर्बंधांच्या विरोधात आक्रमक झालेला असून, दुकानांची वेळ वाढवावी अशी मागणी सरकारकडे केलेली आहे. परंतु राज्य सरकारकडून मात्र काहीच प्रतिसाद मिळत नाही. ठाकरे सरकारने घातलेल्या निर्बंधामुळे शहरांमधील व्यापारी वर्ग आता अस्वस्थ झालेला असून, आता धंद्याचे काय होणार हाच प्रश्न त्यांना सतावत आहे.