प्रभू राम माझ्या रक्तात!

अंजली भागवतने अयोध्येतील सोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिका मिळाल्यावर व्यक्त केला आनंद

प्रभू राम माझ्या रक्तात!

महेश विचारे

येत्या २२ जानेवारीला अयोध्या नगरीत होणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची सगळ्यांना आस लागली आहे. प्रत्येक जण या सोहळ्यात रंगू इच्छित आहे. देशभरातील काही मोजक्या लोकांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्याकडे या उत्सवाच्या निमंत्रण पत्रिका पोहोचल्या आहेत. हे सगळे भाग्यवंत प्रचंड आनंदात आणि उत्साहात आहेत. महाराष्ट्राची आघाडीची नेमबाज आणि खेलरत्न पुरस्कार विजेती खेळाडू अंजली भागवतलाही ही निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. ही निमंत्रण पत्रिका मिळाल्यामुळे अंजली प्रचंड खुश आहे.

यासंदर्भात ती म्हणाली की, मला हे अपेक्षितच नव्हते. अर्थात, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मी तिथे जाणारच होते. पण मला या सोहळ्यासाठी खास पत्रिका मिळेल असे वाटत नव्हते. पण ती मिळाली याचा प्रचंड आनंद आहे. काहीतरी पुण्य केले म्हणून मला ही संधी मिळाली आहे.

अंजलीने सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघटन मंत्री वसंतराव भागवत हे माझे चुलत सासरे. त्या अर्थाने प्रभू श्रीराम हे माझ्या रक्तातच आहेत.

अंजलीने सांगितले की, मला काही दिवसांपूर्वी राम मंदिर न्यासकडून फोन आला की, भेट घ्यायची आहे तुम्ही भेटू शकाल का? मी तेव्हा हो म्हटले. पत्रिका मिळणार म्हणून आनंद होताच पण नंतर जवळपास १५ दिवस फोन आला नाही त्यामुळे कदाचित शॉर्टलिस्ट केलेल्या नव्या यादीत आपण नसू अशी शंकाही आली. पण नंतर फोन आलाच आणि निमंत्रण घेऊन मंडळी घरी आली. माझ्यासाठी हे आश्चर्यजनक होते, धक्कादायक होते. देशभरातील काही मोजके लोक या सोहळ्यासाठी निवडले गेलेत त्यात आपलेही नाव घेतले गेले ही भाग्याचीच गोष्ट आहे, असे मला वाटले.

हे ही वाचा:

रोहित पवारांच्या बारामती ऍग्रोवर ईडीचे छापे

दाऊदच्या स्थावर मालमत्तेची खरेदी केली दिल्लीच्या अभय श्रीवास्तव यांनी

भव्य राम मंदिरातील प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट

उत्तर भारतातील नागरीक गारठले; दोन ते तीन अंशांनी तापमान घसरले

अंजली म्हणाली की, प्रत्येक भागातून विविध क्षेत्रातील काही मोजक्या लोकांनी बोलावले जात आहे. पुण्यातून आपल्याला ही संधी मिळाली ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करा, घरोघरी दिवे लावा असे आवाहन केले आहे, त्याबद्दल अंजली म्हणते की, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. शेवटी एका उद्देशाने सगळ्यांनी एकत्र यावे यासाठीच त्यांनी केलेले हे आवाहन आहे. आपण त्याचे स्वागतच करतो. संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे माध्यम राम आहे. मागे करोनाच्या काळात पंतप्रधानांनी डॉक्टर, पोलिस यांचे कौतुक करण्यासाठी थाळ्या वाजविण्याचे, दिवे लावण्याचे आवाहन केले होते. त्यातूनही देशाला त्या प्रतिकूल परिस्थितीत एकत्र आणणे हेच एकमेव उद्दीष्ट होते.

Exit mobile version