केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी (९ सप्टेंबर) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अमेरिकेत केलेल्या विधानांवर हल्ला केला आहे. शिवराज सिंह चौहान म्हणाले की, परदेशी भूमीवर अशा प्रकारे देशाची प्रतिमा मलिन करणे हे देशविरोधी कृत्य आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी (८ सप्टेंबर ) डॅलसमध्ये भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करताना, भारतीय राजकारणातून प्रेम, आदर आणि नम्रता गायब झाल्याचे म्हटले.
डॅलस येथील टेक्सास विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गांधी यांनी भारतातील उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली आणि ते म्हणाले की भारत, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देश बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहेत, तर चीनमध्ये असे घडत नाही कारण जागतिक उत्पादनावर त्याचे वर्चस्व आहे. दरम्यान, राहुल गांधी यांची परदेशात केलेल्या भाषणावर केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भाष्य केले आहे.
शिवराज सिंह चौहान यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राहुल गांधी (लोकसभा) विरोधी पक्ष नेते आहेत आणि विरोधी पक्षनेते देशाला उत्तरदायी आहेत. ते पुढे म्हणाले, परदेशात देशाची प्रतिमा मलिन करणे हे देशविरोधी कृत्य आहे आणि असे कृत्य कोणीही देशभक्त करत नाही.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्याने राहुल गांधी हताश झाले आहेत आणि आपली निराशा निराधार पद्धतीने व्यक्त करत आहेत. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय संघावर देखील टीका केली होती. राहुल गांधींच्या टीकेवर निशाणा साधत चौहान म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लाखो कार्यकर्त्यांना तयार केले आहे, ज्यांनी आपले आयुष्य भारतासाठी समर्पित केले आहे.
हे ही वाचा :
आंदोलन सोडा, दुर्गापूजेकडे लक्ष द्या…ममतांच्या वक्तव्यामुळे पीडितेच्या आईकडून संताप
७० किलो वजनाचे सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी उलटवण्याचा कट !
‘मुंबईच्या डबेवाल्या’ची कथा केरळच्या पाठ्यपुस्तकात !
चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीची वाहनांना धडक; चालकाला अटक
ते पुढे म्हणाले, काँग्रेस, भाजप आदी पक्षांचे राजकारण हे देशापुरते मर्यादित असले पाहिजे आणि कोणालाही याचे भान असले पाहिजे की, परदेशात राहून आपण देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत. भारतातील प्रत्येक गोष्ट ‘मेड इन चायना’ असल्याच्या राहुल गांधींच्या टिप्पणीवर चौहान यांनी टीका केली. अशी वक्तव्ये म्हणजे देशातील कुशल कामगारांचा अपमान करण्यासारखे आहे. भारतातील कुशल कामगार आणि कर्मचारी अनेक गोष्टी स्वदेशी बनवत आहेत, पण राहुल गांधी त्यांचा अपमान करत आहेत. राहुल गांधी यांची मुळे भारतीय मातीशी जोडलेली नाहीत, त्यांना भारतीय लोकांशी, त्यांच्या संस्कृतीशी, परंपरांशी काहीही देणेघेणे नाही, असे मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.