छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीवर झाला होता. याच पार्श्वभूमीवर शिवनेरी किल्ल्यावर दरवर्षी मोठ्या उत्साहात १९ फेब्रुवारी रोजी शिव जयंतीचा सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी कोरोना नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे अनेक शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित आहेत. दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पाळणा जोजवला जातो. मात्र, यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित नव्हते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित आहेत.
यावेळी बाळ शिवबासाठी काही महिलांनी पाळणा गायला. तेव्हा अजित पवार, आदित्य ठाकरे यांनी पाळण्याला झोका दिला. त्यानंतर पोलीस पथकाकडून शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. यावेळी ढोल पथक, लेझीम पथक देखील उपस्थित होते. ढोल ताशांच्या आवाजाने संपूर्ण परिसर दुमदुमला होता. शिवनेरीवर विविध साहसी खेळांचे तसेच लेझिमसारख्या कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले होते.
हे ही वाचा:
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
गायिका वैशाली भैसनेला जीवे मारण्याची धमकी
शिवनेरी किल्ल्याप्रमाणेच राज्यातील इतर अनेक भागांमध्ये देखील शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने दादर येथील शिवाजी पार्कातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते. सांगली, मनमाड, नागपूर, नवी मुंबई येथे देखील शिवजयंतीचा उत्साह दिसून येतो आहे. राजधानी नवी दिल्लीतही शिवजयंतीचा उत्साह दिसून येत असून महाराष्ट्र सदनात शिवजयंती साजरी होत आहे.