स्वराज्य संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर झाला होता. या दिवसाला भारताच्याचं नव्हे तर जगभराच्या इतिहासात फार महत्त्व आहे. रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर होऊन ‘छत्रपती’ असे बिरुद धारण करून शिवराय मराठा साम्राज्याचे अधिपती झाले.
महाराजांचा राज्याभिषेक होणं ही भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासाला कटालणी देणारी घटना होती. या घटनेच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाचा हा शिवराज्याभिषेक दिन ३५० वा असून तो आणखी विशेष असणार आहे.
महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे नवचैतन्याचा सोहळा
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजेच ६ जून १६७४ ला राज्याभिषेक करून घेतला. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या समाजाचा नवचैतन्याचा सोहळा पार पडला. राज्याभिषेकावेळी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ आणि ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याच्या उत्तम कारभारासाठी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली. राज्याचा कारभार आणि पदे वाटून दिली.
न भूतो न भविष्यति असा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक सोहळा हा न भूतो न भविष्यति असा होता. मुघल सैन्य उत्तरेत गुंतलेले असताना त्यांचा दक्षिणेत कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला होता. त्यानुसार राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.
राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. साधारण सहा दिवस विविध समारंभ होत होते. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ पार पडले. तोफांना सरबत्ती देण्यात आल्या.
राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली.
६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला. या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदैवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मणांना यावेळीही आभूषणे आणि वस्त्रे भेट देण्यात आली. अष्टप्रधानांतील आठ प्रधान गंगेसारख्या विविध नद्यांतून आणलेले पाण्याचे जलकुंभ घेऊन उभे होते. त्यानंतर त्या जलकुंभांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर अभिषेक केला गेला.
३२ मण सोन्याचे भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते. छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. प्रजेने या त्यांच्यातल्या राजाला आशीर्वाद देत ‘शिवराज की जय’च्या घोषणा दिल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून उच्चार केला. यावेळी महाराजांनी दान देखील केले.
महाराजांचा पुन्हा एकदा अभिषेक
राज्याभिषेकाच्या नंतर १२ जून १६७४ रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या.
हे ही वाचा:
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!
३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?
बेपत्ता लोकांच्या शोधाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांचे डोळे डबडबले!
‘नासिरुद्दीन यांच्या फार्महाऊसवर पुरस्काराची ट्रॉफी बनली बाथरूमचे हँडल
राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यु झाला. याशिवाय काही आकस्मिक घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला आणि तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.
वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पुढे ३० वर्षांच्या संघर्षानंतर शिवरायांनी राज्याभिषेक करुन घेतला आणि शिवराय छत्रपती झाले!