प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज!
छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगात पसरलेली आहे. साऱ्या जगतासाठी ते आराध्यदैवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या, धाडसाच्या अनेक कथा, मराठ्यांचा शौर्याचा इतिहास प्रत्येकाने अभ्यासलेला आहे. त्यांचे कार्य हे भव्यदिव्य आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. राज्यासह देशभरात याचा उत्साह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला.
बालपणापासून स्वराज्याचे बाळकडू त्यांना त्यांच्या मातोश्रींकडून मिळाले होते. जिजामातेने शिवाजी राजांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि गीता शिकवले. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली महाराजांनी तलवारबाजी, युद्धसराव अशा अनेक कला शिकून घेतल्या. शिवाजी महाराजांनी अनेक नव्या युद्ध शैली तयार केल्या आणि स्वराज्य स्थापन केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि गनिमी कावा
छत्रपती शिवाजी महाराज यांना गनिमी कावा या युद्धनीतीचे जनक मानले जाते. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर रुळलेल्या आणि सह्याद्रीचा कानाकोपरा माहित असलेल्या मावळ्यांच्या साथीने महाराजांनी गनिमी काव्याने अनेक मोहिमा फत्ते केल्या. गनिमी कावा म्हणजे संपूर्ण परिसराची माहिती घेऊन आणि नैसर्गिक बाबींच्या सहाय्याने शत्रूंवर हल्ला करणे. विशेष म्हणजे अचानक हल्ला करून शत्रूची दाणादाण उडवून देणं. कमी मावळ्यांच्या मदतीने जास्त संख्येने चाळ करून आलेल्या शत्रूवर विजय मिळविण्यासाठी महाराजांनी ही रणनीती आखली होती. जगभरात या रणनीतीची चर्चा होते आणि महाराजांची आठवणही काढली जाते.
महाराजांचे तत्त्व म्हणजे स्त्रीसन्मान
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी सर्व एकसमान होते. महिलांचा ते विशेष आदर करत असत. शत्रूच्या ठिकाणांवर हल्ला करतानाही तेथील महिलांना ते आदरपूर्वक आणि सन्मानाने सोडून देत असत. कोणतीही जात किंवा धर्म असो महिलांना आदराने वागवण्याच्या त्यांच्या सूचना मावळ्यांना असत. महाराजांनी ताब्यात घेतलेल्या भागातील स्त्रियांना कधीही कैदी म्हणून नेले नाही. ज्यांनी महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना कठोर शिक्षा झाली. जिजाऊ यांनी शिवरायांना स्त्रियांचा आदर करणे आणि त्यांच्याशी अत्यंत आदराने वागण्याचे योग्य आचार आणि तत्त्वे महाराजांना लहानपणापासूनचं शिकवली होती.
हे ही वाचा:
काका पुतण्याचे संबंध कसे असावेत? रितेश देशमुखांनी सांगितली आठवण
संदेशखाली हिंसाचार:टीएमसी नेते शिबू हाजरांना ८ दिवसांची पोलिस कोठडी!
कमलनाथ यांना काँग्रेसने नाकारले राज्यसभेचे तिकीट, म्हणून…
हाताला सूज आली, मग शरीर सुजले…’दंगल’फेम सुहानीच्या निधनाचे कारण आले समोर
नौदलाचे जनक
शिवाजी महाराजांनी अगदी योग्य वेळीच प्रबळ नौदल दलाचे महत्त्व ओळखले होते. समुद्रातून येणाऱ्या शत्रूला रोखण्यासाठी त्यांनी योग्य पावले उचलण्यास सुरुवात केली. डच, पोर्तुगीज आणि ब्रिटीश तसेच समुद्री चाच्यांसारख्या परकीय आक्रमकांना रोखण्यासाठी त्यांनी एक शक्तिशाली नौदल तयार केले. दूरदृष्टीने विचार करून शिवाजी महाराजांनी विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि इतर अनेक ठिकाणी नाविक किल्ले बांधले. त्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
एका दूरदृष्टी असलेल्या राजाने प्रगतीशील अशी वाटचाल केली. असंख्य किल्ल्यांचे शिल्पकार आणि पुरोगामी धोरणांचे पुरस्कर्ते, कुशल योद्धा, पराक्रमी आणि संवेदनशील राजा म्हणून त्यांनी भारताच्या इतिहासावर स्वतःची अशी छाप सोडली आहे.