शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या मीनाताई कांबळी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मीनाताई कांबळी ह्या अत्यंत निकटवर्तीय मानल्या जातात.एकीकडे रश्मी ठाकरे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाक्यावरील नवरात्रौत्सवात सहभागी होण्यासाठी गेल्या असताना दुसरीकडे रश्मी ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसला आहे.शिवसेना ठाकरे गटाने नेते पदाची नियुक्ती जाहीर झाल्यानंतर मीनाताई कांबळी यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.
गेल्या वर्षभरात स्वतःचा पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.इतर राजकीय पक्षांमधील आमदार, खासदार, सभासद आणि कार्यकर्ते स्वतःच्या पक्षाला राम-राम ठोकत अन्य पक्षात सामील होत आहेत.त्यामुळे सर्व पक्षात सदस्यांचे भरती-ओहोटीचे प्रमाण दिसून येते.खास करून उद्धव ठाकरे यांच्या गटाला याचा फटका जास्त बसला आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर ठाकरे गटाला उतरती कळा लागल्याचे चित्र आहे.अनेक विश्वासू नेते, कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात सामील झाले.त्यातच ठाकरे गटाच्या आक्रमक महिला चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीनाताई कांबळी यांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी अंधारेंची धडपड, मंत्री शंभूराज देसाईंचा आरोप!
मुंबईत सैराट चित्रपटाची पुरावृत्ती; नव जोडप्याची हत्या, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले
बायडेन यांच्या पाठोपाठ ऋषी सुनकही करणार इस्रायल दौरा?
गाझा पट्टीतील रुग्णालयावरील हल्ला कोणी केला?
मीनाताई कांबळी या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत. महाविकास आघाडी सरकाच्या काळात शिर्डी संस्थानच्या विश्वस्त म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. मातोश्री बचत गटाच्या त्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे मीनाताई कांबळी यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला आहे. महिलांमध्ये त्यांचा संपर्क आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी मीनाताई कांबळी यांनी शिंदे गटात प्रवेश करणे, ही बाब ठाकरे गटासाठी चिंतेची ठरण्याची शक्यता आहे.
मीनाताई कांबळी या दक्षिण मुंबईत अधिक सक्रिय आहेत. मीनाताई कांबळी यांनी २०१७ मध्ये मुंबई महापालिका निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मीनाताई कांबळी यांच्या कार्यपद्धतीला घेऊन स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे, विशेषत: महिला शिवसैनिकांचे आक्षेप होते. अशातच काही महिला शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.