डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाचे संस्थापक आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त बापू खरमाळे यांचे १४ जून रोजी सकाळी ९-३०च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी ते ६९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
दहा दिवसापूर्वी त्यांना जुन्नर-पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. पण काल अचानक त्यांच्या निधनाची बातमी आली आणि कबड्डी वर्तुळात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.
बापू हे क्रीडा शिक्षक म्हणून डॉ.शिरोडकर हायस्कुल येथे नोकरीवर रुजू झाले. त्या ठिकाणी त्यांनी कबड्डी, खो-खो व लंगडी या खेळावर लक्ष केंद्रित केले. पण परळ ह्या भागात कबड्डी या खेळाचा जोर जास्त असल्याने कबड्डीकडे त्यांचा अधिक ओढा होता. त्यातूनच मग डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या महिला संघाची स्थापना त्यांनी केली.
भारती विधाते-भुजबळ, मनीषा गावंड-कदम, स्नेहल साळुंखे-कुदळे व मेघाली कोरगावकर-म्हसकर या श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू त्यांच्याकडे घडल्या. त्याशिवाय नयना पालांडे, सुजाता साळुंखे-काळगावकर, संगीता घाडीगांवकर, सुनीता जाधव, लता केर, तृप्ती कोचरेकर-शिवतरकर, श्रद्धा काळे ते आताची क्षितिजा हिरवे पाऱ्यांच्या खेळाडू या त्याच्याकडेच उदयास आल्या.
हे ही वाचा:
एरिक्सन पुन्हा उभा राहतोय! चाहत्यांचे मानले आभार
शासकीय कर्मचारी होणार रिक्षावाले?
शिक्षकांनो १००% उपस्थिती हवी, पण शाळेत जायचे बस, टॅक्सीने!
… तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा
शांत व संयमी असलेले बापू विरोधी संघातील खेळाडूंचा अभ्यास करण्यात माहीर होते. त्यानुसार ते आपल्या संघाची रणनीती आखत. या त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे त्यांनी नवयुग क्रीडा मंडळ व विश्वशांती या त्या काळातील दादा संघांना आव्हान उभे केले होते. त्यांच्या या वृत्तीची दखल घेत कबड्डीमहर्षी शंकरराव (बुवा) साळवी यांनी घेत त्यांना महाराष्ट्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदी अनेक वेळा नेमणूक केली होती. महाराष्ट्र शासनाने देखील बापूंच्या या कार्याची दखल घेत सन २००१-०२ साली “दादोजी कोंडदेव” हा प्रशिक्षकांसाठी देण्यात येणारा मानाचा पुरस्कार देऊन गौरव केला होता.
“खेळाडूंच्या खेळाची व मानसिकतेची जाण असलेला तज्ञ प्रशिक्षक महाराष्ट्राने आज गमावला. त्यांची उणीव महाराष्ट्राला नेहमीच जाणवत राहील.” अशा शब्दात महाराष्ट्र कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.संघटनेचे अध्यक्ष अजित पवार व कार्याध्यक्ष गजानन कीर्तिकर यांनी देखील हळहळ व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली दिली. अखेर कालच मु.पो.खोरड, ता.जुन्नर, पुणे येथील त्यांच्या मूळ गावातील स्मशानभूमीत त्यांचा मुलगा स्वप्नील यांनी अंत्यसंस्कार करून शेवटचा निरोप दिला.