सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी तसेच नागरिकांना महागाईपासून दिलासा मिळावा याकरीता फक्त शंभर रुपयांमधे चार वस्तू देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. दिवाळी सणासाठी शिधापत्रिका धारकांना रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल गुरुवार, २० ऑक्टोबरपासून म्हणजेच उद्यापासून मिळणार आहे.
राज्य सरकारने या दिवाळी किटचे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन या संस्थेला ५०९ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. या संस्थेने पुरवठादार कंपन्यांना कंत्राट दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्यात येणार आहे. या दिवाळी किटमध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्यात येणार आहे.
या किटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. तसेच या किटला ‘आनंदाचा शिधा’ हे नाव देण्यात आले आहे. यामुळे आता सामान्याची दिवाळी गोड होणार आहे, मात्र काही ठिकाणी वाटप करण्यासाठी माल आला आहे. तर काही ठिकाणी आलेला नाही, मात्र लवकरात लवकर ही किट शिधाधारकांना मिळेल, अशी माहिती आहे.
हे ही वाचा:
गांधी कुटुंबियांच्या मर्जीतले खर्गे काँग्रेसचे अध्यक्ष
‘ठाकरे कुटुंबियांचे उत्पन्न आणि संपत्तीचा मेळ लागत नाही’
युक्रेनवरील रशियन हवाई हल्ल्यात चार ठार
पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती
दरम्यान, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. अन्नधान्याचे दर वाढत असल्याने घरखर्च भागवणे नागरिकांना अवघड झाले आहे. गेली दोन वर्षे करोनामुळे अनेकांची बिघडलेली आर्थिक घडी हळूहळू बसत असली तरी गोरगरीब कुटुंबाना दिलासा देण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारने आनंदाचा शिधा योजना आणली आहे.