शेख हसीना भारतात राहिल्याने द्विपक्षीय संबंधांना धक्का पोहोचणार नाही !

बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या सल्लागाराचे वक्तव्य

शेख हसीना भारतात राहिल्याने द्विपक्षीय संबंधांना धक्का पोहोचणार नाही !

बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्या देशात राहण्याबाबत अनेक प्रकारचे अंदाज बांधले जात असून त्यात भारत-बांगलादेश संबंधांबाबतही चर्चा होत आहे. या प्रकरणी अंतरिम सरकारचे परराष्ट्र सल्लागार मोहम्मद तौहीद हुसैन यांचे वक्तव्य समोर आले आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारतात दीर्घकाळ राहिल्याने द्विपक्षीय संबंधांना हानी पोहोचणार नाही आणि देश नवी दिल्लीशी मजबूत संबंध राखण्याचा प्रयत्न करेल.

हसीना यांचा भारतातील मुक्काम वाढवल्यास भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना हुसैन यांनी ही सोमवारी (१२ ऑगस्ट) टिप्पणी केली. दरम्यान, बांगलादेशमध्ये अजूनही काही भागात हिंसाचार सुरु आहे. आतापर्यंत ४५० हुन अधिक लोकांचा मुत्यू झाला आहे.

युनायटेड न्यूज ऑफ बांगलादेश या वृत्तसंस्थेनुसार, हुसैन म्हणाले की, हा एक काल्पनिक प्रश्न आहे. एखाद्या देशात राहून त्या देशाशी असलेल्या संबंधांवर कसा परिणाम होईल? असे होण्याचे कारण नाही.” हुसेन म्हणाले की, द्विपक्षीय संबंध हे परस्पर हितसंबंधांचे आहेत आणि मैत्री या हितसंबंधांवर अवलंबून आहे. हितसंबंध दुखावले तर मैत्री चालत नाही. द्विपक्षीय संबंध ही महत्त्वाची बाब आहे, यावर त्यांनी भर दिला. भारतासोबत नेहमीच चांगले संबंध ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

हे ही वाचा:

प्रमोद भगत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकला मुकणार; १८ महिन्यांसाठी निलंबित

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या नऊ जणांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

बांगलादेशमधील अराजकतेचा परिणाम नागपूरच्या संत्र्यांवर? निर्यात रखडली

… म्हणून मुनव्वर फारुकीने मराठी माणसांची मागितली माफी!

दरम्यान, हसीना शेख यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडल्यानंतर नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार चालवले जात आहे. त्यांनी बांगलादेशातील हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. बांग्लादेशच्या सरकारच्या भूमिकेवर देखील भारत नजर ठेवून आहे.

Exit mobile version