29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरविशेषस्मिता पाटील .... बोलका चेहरा आणि मुद्देसूद बोलणं

स्मिता पाटील …. बोलका चेहरा आणि मुद्देसूद बोलणं

Google News Follow

Related

स्मिता पाटीलला पडद्यावर व्यक्तिरेखेनुसार आपला अभिनय आणि संवाद यांना योग्य न्याय देणे आणि प्रत्यक्ष आयुष्यातही आपले स्वतंत्र व्यक्तीमत्व जपणे हा समतोल साध्य झाला. याचे कारण म्हणजे, समांतर आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या चित्रपटांच्या विश्वात वावरताना त्यांनी आपले एक जागरुक व्यक्तीमत्व म्हणून स्वतःला घडवले.
बोलकी नजर ही स्मिता पाटील यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद. ‘उंबरठा ‘ची सुलभा महाजन असो ‘अमृत ‘ या चित्रपटातील कमला असो स्मिता पाटील यांनी केवळ एक्स्प्रेशनने बरेच काही व्यक्त केले आहे. चित्रपट हे दृश्य माध्यम असून संवादाचा आवश्यक इतपत पण प्रभावी वापर करावा आणि आपलं पाहणं, बघणं, दिसणं यातून बरेच काही सांगता येतं हे स्मिता पाटील यांच्या अभिनयाचे ठळक सूत्र दिसते.
अशा आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलेल्या स्मिता पाटील यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी पुण्यातला . वडील शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे प्रस्थ तर आई विद्याताई पाटील सामाजिक सेवेत कार्यरत. स्मिता पाटील यांना अनिता आणि गीता अशा आणखी दोन बहिणी…. स्मिता पाटील यांचे नाव सामाजिक, सांस्कृतिक आणि माध्यम क्षेत्रात असे सगळीकडे कायमच आदराने घेतले जाते. आणि अर्थातच यापुढेही त्यांच्याबाबतचा तो आदर कायम राहिल.
रुपेरी पडद्यावर भारतीय स्त्रीची पर्यायी प्रतिमा साकारणारी सक्षम अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांचे भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात वेगळं स्थान आहे. ते त्यांनी आपल्या गुणवत्तेवर निर्माण केले. अल्पायुषी ठरलेल्या स्मिता पाटील यांनी विविध व्यक्तिरेखांच्या संवेदना व त्यांचं व्यक्तिमत्व इतक्या प्रभावीपणे आणि सूक्ष्म बारकाव्यांसह अभिव्यक्त केलं की त्यामुळे पडद्यावरील सौंदर्याच्या रुढ संकल्पना दुय्यम ठरल्या हे तुमच्याही लक्षात आले असेलच. राष्ट्रसेवादलाच्या सांस्कृतिक कार्यात सक्रिय असलेल्या स्मिताने १९७४ साली अरुण खोपकर यांच्या एफटीआयआयच्या ‘तीव्र मध्यम ‘ या डिप्लोमा फिल्ममध्ये त्यांनी सर्वप्रथम काम केले. तर दृकश्राव्य माध्यमाची सुरुवात दूरदर्शनवरील ‘बातमीदार’ या नात्याने केली. छोट्या पडद्यावरुन या भूमिकेवरुन त्यांचे सुप्त गुण हेरुन दिग्दर्शक श्याम बेनेगल त्यांनी ‘निशांत’ आणि ‘चरणदास चोर’ या चित्रपटात अभिनयाची संधी दिली. सुरुवातीची पावलेच अशी व्यवस्थित पडली. आणि मग पुढचीही पावले ठसा उमटवणारी ठरली.
अभिनेत्री म्हणून करियर आकाराला येत जाताना स्मिता पाटील यांनी काही वेगळ्या जाॅनरच्या मराठी चित्रपटात भूमिका साकारल्या. आणि कळत नकळतपणे आपण चौकटीबाहेरचा विचार करतोय असे दाखवले. तो त्यांचा स्वभाव होता. डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित ‘सामना ‘मधील या डाॅ. श्रीराम लागू यांनी साकारलेल्या टोपीखाली दडलय काय या गाण्यात जी युवती आपण पाहतो त्या स्मिता पाटील आहेत. तर डाॅ. जब्बार पटेल दिग्दर्शित बहुचर्चित ‘जैत रे जैत ‘ आणि ‘उंबरठा ‘ ( हाच चित्रपट हिंदीत ‘सुबह’ या नावाने निर्माण झाला), रामदास फुटाणे दिग्दर्शित ‘ सर्वसाक्षी ‘, चंद्रकांत जोशी दिग्दर्शित ‘सूत्रधार ‘ या चित्रपटांनी त्यांची मराठी चित्रपटातील वाटचाल विशेष लक्षवेधक ठरली. ‘उंबरठा ‘मध्ये स्मिता पाटील यांनी साकारलेली सुलभा महाजन ही स्री मुक्ती विचारांची स्री होती.
स्मिता पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत समांतर चित्रपट अथवा न्यू वेव्ह चित्रपटात मोठ्या प्रमाणात भूमिका साकारल्या. आणि या चळवळीला अधिकाधिक समृद्ध केले. त्याचा जाणकार प्रेक्षकवर्ग वाढवण्यास कळत नकळतपणे सहभाग घेतला. अशा चित्रपटांच्या परिसंवादात स्मिता पाटील आवर्जून सहभाग घेऊन ‘त्या व्यक्तिरेखेमागची आपली भूमिका आणि आपली व्यक्तिगत मते अगदी ठामपणे व्यक्त करत’. आपली बांधिलकी फक्त पडद्यापुरती नाही हे यातून त्यांनी सिध्द केले. त्यातील काही उल्लेखनीय चित्रपट म्हणजे, श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘कोंडुरा ‘, मुजफ्फर अली दिग्दर्शित ‘गमन’, गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘आक्रोश ‘,आणि ‘अर्धसत्य ‘, सईद मिर्झा दिग्दर्शित ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है ‘, रवीन्द्र धर्मराज दिग्दर्शित ‘चक्र ‘, के. ए. अब्बास ‘द नक्सलाईटस ‘, सागर सरहादी दिग्दर्शित ‘बाजार ‘, टी. एस. रंगा दिग्दर्शित ‘गिध्द ‘, केतन मेहता दिग्दर्शित ‘मिर्च मसाला ‘, उपलेन्दू चक्रवर्ती दिग्दर्शित ‘देबशिशू ‘ हे आहेत.
समांतर अथवा कलात्मक चित्रपटात भूमिका साकारत असतानाच स्मिता पाटील यांनी निखिल सैनी दिग्दर्शित ‘तजुर्बा ‘ ( १९८१) या चित्रपटातून व्यावसायिक चित्रपटात पाऊल टाकले. त्यात नसिरुद्दीन शहा, राज बब्बर इत्यादींच्याही भूमिका आहेत. स्मिता पाटील यांनी अनेक मनोरंजक चित्रपटात भूमिका साकारली. त्यात राजेश खन्नासोबत ‘दिल ए नादान’, आवाम, नझराना, आखिर क्यू, अमृत, अनोखा रिश्ता या चित्रपटात भूमिका साकारली. रवि टंडन दिग्दर्शित ‘नजराना ‘ या चित्रपटात राजेश खन्ना , श्रीदेवी आणि स्मिता पाटील असे तीन तुल्यबळ कलाकार होते.
त्या काळात अमिताभ बच्चनची नायिका होणे खूपच प्रतिष्ठेचे होते. ते त्या काळातील एक फिल्मी वैशिष्ट्य. लगेचच आघाडीची नायिका म्हणून ओळख निर्माण होई. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शक्ती ‘ आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘नमक हलाल ‘ या दोन चित्रपटात अमिताभची नायिका बनण्याचा स्मिता पाटील यांना योग आला. ‘नमक हलाल ‘मध्ये आ रपट जाये तो हमे ना…. या गाण्यात मुसळधार पावसात अमिताभसोबत स्मिता पाटील यांनी नृत्य केल्यावरुन बरीच उलटसुलट चर्चा रंगली.
स्मिता पाटील यांच्या मसालेदार चित्रपटात ‘बदले की आग’, भीगी पलके, चटपटी, दर्द का रिश्ता, घुंगरु, हादसा, कयामत, आज की आवाज, आनंद और आनंद, पेट प्यार और प्यास, जवाब, गुलामी, मेरा घर मेरे बच्चे इत्यादी चित्रपटात भूमिका साकारल्या. कलाकाराला व्यावसायिक गरज म्हणून आपल्या चित्रपटांची संख्या वाढवावी लागते ती अशी. आणि त्यात गैर ते काय? बी. आर. चोप्रा यांच्या ‘आज की आवाज ‘मध्ये भूमिका साकारत असताना आपणास स्मिता पाटीलने बरेच सांभाळून घेतले असे नाना पाटेकर यांनी अनेकदा आपल्या मुलाखतीत सांगितले आहे.
त्या काळात स्मिता पाटील आणि शबाना आझमी यांच्या गुणवत्तेची कायमच तुलना केली जाई. मिडियात तर त्यावरुन बरेच काही लिहिले गेले. महेश भट्ट दिग्दर्शित ‘अर्थ ‘ ( १९८२) या चित्रपटातील या दोघींचा अभिनयाचा सामना फारच गाजला. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे १९८३ साली श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘मंडी ‘ या चित्रपटात त्या दोघी पुन्हा एकमेकांसमोर आल्या.
स्मिता पाटील आणि पुरस्कार यांचे नाते अतिशय घट्ट आहे. याचे कारण म्हणजे समांतर चित्रपट असो अथवा पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट असो, स्मिता पाटील यांनी नेहमीच दर्जेदार अभिनय केला. तिच त्यांची ताकद तेच त्यांचे खास वैशिष्ट्य. काही उल्लेखनीय पुरस्कार सांगायचे तर, ‘मंथन’ आणि ‘चक्र ‘ या चित्रपटातील अभिनयासाठी फिल्म फेअरचा विशेष अभिनेत्री पुरस्कार, ‘जैत रे जैत’ साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, ‘भूमिका ‘ आणि ‘चक्र’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार, याखेरीज राष्ट्रीय एकता पुरस्कार, आशीर्वाद अवाॅर्ड, जायंटस अवाॅर्ड असे स्मिता पाटील यांनी असंख्य पुरस्कार पटकावले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील पदार्पणानंतर बेनेगल यांनीच दिग्दर्शित केलेल्या मंथन’ आणि ‘भूमिका’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या. यातील कसदार अभिनयामुळे स्मिता पाटील यांना कलात्मक चित्रपट सृष्टीत मान्यता मिळालीच आणि राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाला. स्मिता पाटील यांनी मग मराठी, हिंदी, पंजाबी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम आणि तेलगू अशा एकूण आठ भाषांतील चित्रपटात भूमिका साकारलीय. १९७४ सालीच स्मिता पाटील यांनी निर्माते किशोर मिस्कीन यांच्या चंद्रवदन दिग्दर्शित ‘राजा शिवछत्रपती ‘ या चित्रपटात भूमिका साकारत मराठी चित्रपटात भूमिका साकारायला सुरुवात केली. हंसा वाडकर या अभिनेत्रीच्या आत्मकथेवर आधारित श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘भूमिका ‘( १९७७) मधून तिने पुरुषप्रधान संस्कृतीत शोषित असलेल्या स्त्रीच्या संवेदना प्रभावीपणे अभिव्यक्त केल्या. काॅस्टा गॅव्हाराससारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या दिग्दर्शकाने १९८४ साली फ्रान्समध्ये पॅरीस आणि ला रोशेल अशा दोन्ही ठिकाणी स्मिता पाटील यांच्या चित्रपटांचे महोत्सव आयोजित केले गेले . अशा प्रकारचा चित्रपट महोत्सव आयोजित केली गेलेल्या स्मिता पाटील या आशियातील पहिली अभिनेत्री आहेत. माॅन्ट्रियल येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणून काम करण्याचा बहुमान स्मिता पाटीलना मिळाला. १९८५ साली नैरोबी येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेसाठी भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी स्मिता पाटील यांना मिळाली
चित्रपटात भूमिका साकारत असतानाच स्मिता पाटील यांनी बीज आणि वासनाकांड या वेगळ्या प्रवाहातील तसेच ‘छिन्न ‘ या व्यावसायिक मराठी नाटकात भूमिका केली. नाटक आणि चित्रपट ही माध्यमे पूर्णपणे वेगळी आहेत. दोन्हीत प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचे मार्ग आणि गरजा वेगळ्या आहेत याचे भान त्यांनी कधीच सोडले नाही. आपल्या अभिनयातून ते वेगळेपण दाखवलं. आपल्या कामातून आपण बोलावे हा स्मिता पाटील यांचा दृष्टिकोन होता आणि तो दिसून येई. विशेष म्हणजे अॅलेक पद्मसी दिग्दर्शित ‘रिक्वेस्ट काॅन्सर्ट ‘ या एकपात्री नाटकातही स्मिता पाटील यांनी अभिनय केला आहे. या सगळ्या प्रवासात स्मिता पाटील यांनी विवाहित राज बब्बरशी लग्न केल्याने सगळ्यानाच आश्चर्याचा धक्का बसला.
स्मिता पाटील यांच्या दर्जेदार अभिनय आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९८५ साली ‘पद्मश्री पुरस्कारा’ने गौरवले.
१२ डिसेंबर १९८६ रोजी हिंदी चित्रपटसृष्टीच्या वतीने मुंबईत ब्रेबाॅर्न स्टेडियमवर ‘होप्स ८६’ या अतिशय भव्य कलरफुल इव्हेन्टसचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे वृत्त येण्याऐवजी त्याच रात्री स्मिता पाटील यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जसलोक इस्पितळात दाखल करण्यात आले असल्याचे वृत्त आले. २९ नोव्हेंबर १९८६ रोजी एका बाळाला जन्म दिलेल्या स्मिता पाटीलच्या या आजारपणाची बातमी धक्कादायक होती….. रविवारची सकाळ झाली तीच स्मिता पाटील यांच्या निधनाच्या वृत्ताने.
त्या काळात दीपक सावंत हे स्मिता पाटील यांचे मेकअपमन होते आणि त्यांच्यावर स्मिताजींचा पूर्ण विश्वास होता. त्यांच्यासाठी ही दुःखद बातमी म्हणजे मोठा आघात होता. वांद्र्याच्या कार्टर रोडवरील घरुन स्मिता पाटील यांचे पार्थिव शिवाजी पार्क येथे आणण्यात आले आणि अतिशय दुखित अंतःकरणाने दीपक सावंत यांनी स्मिता पाटील यांचा मेकअप केला.आणि त्यांना अखेरचा निरोप दिला. आजही याबाबत बोलताना दीपक सावंत प्रचंड हेलावून जातात.
आज प्रतिक बब्बरच्या रुपाने स्मिता पाटीलचे एक प्रकारचे ‘प्रतिक ‘ अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा