ठाकूर तो छा गियो

ठाकूर तो छा गियो

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूरच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतीय संघाने १९१ धावांची मजल मारली आहे. तर त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव यांच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडचा डाव अडखळताना दिसत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसा अखेर सामना भारताच्या बाजूने थोडा झुकला आहे असे म्हणता येऊ शकेल.

गुरुवार, २ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू झाला. इंग्लंड मधील प्रसिद्ध अशा ओव्हल मैदानावर हा सामना खेळला जात आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूट याने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय फलंदाजी ही सुरुवातीपासूनच गटांगळ्या खाताना दिसली. या मालिकेतील भारताचे यशस्वी ठरलेले सलामीवीर रोहित शर्मा आणि के.एल राहुल हे दोघेही स्वस्तात परतले.

हे ही वाचा:

देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?

धक्कादायक! घाटकोपर-मानखुर्द उड्डाणपुलावर महिन्याभरात ४० अपघात

२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत

ठाकरे सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही

त्यानंतर कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता इतर कोणालाही प्रभावी खेळी करता आली नाही. विराट कोहलीने अर्धशतक ठोकत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण ५० धावा केल्यावर तो ही बाद झाला. ७ बाद १२७ अशा बिकट परिस्थितीत भारतीय संघ होता आणि शार्दुल ठाकुर मैदानावर खेळण्यासाठी उतरला. उमेश यादवच्या सोबत ठाकूरने कमाल करून दाखवली. कसोटी सामन्यात त्याने टी२० प्रमाणे फलंदाजी केली. अवघ्या ३६ चेंडूंमध्ये त्याने ५७ धावा कुटल्या. ज्यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकार आहेत. शार्दुलच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात १९१ धावांची मजल मारली.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची भारतीय गोलंदाजांनी दाणादाण उडवली. जसप्रीत बुमराहने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर बर्न्स आणि हमीद यांना स्वस्तात माघारी धाडले. तर त्यानंतर उमेश यादवने एका अप्रतिम चेंडूवर इंग्लंड संघाचा कणा असलेल्या कर्णधार जो रूटची दांडी गुल केली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाची स्थिती ३ बाद ५२ अशी आहे आणि सामना भारताच्या बाजूने झुकलेला दिसत आहे.

Exit mobile version