शार्दूल ठाकूरवर अन्याय झाला का?

शार्दूल ठाकूरवर अन्याय झाला का?

मुंबईचा आघाडीचा खेळाडू आणि सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज शार्दूल ठाकूरने केलेल्या कामगिरीची योग्य दखल घेण्यात आली नाही, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे.

शार्दूलने केलेल्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्यालाच खरेतर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळायला हवे होते, असा सूर उमटत आहे. शार्दूलने दोन्ही डावात फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीत चमकदार कामगिरी केली.

मूळचा पालघरचा असलेल्या शार्दूलने इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटीत शार्दूलने ही कामगिरी करून दाखविली. त्याने दोन्ही डावात अनुक्रमे ५७ आणि ६० धावा केल्या. तसेच दोन डावांत मिळून तीन बळीही घेतले. पण त्याच्या या कामगिरीची दखल घेतली गेली नाही अशी टीका आता होत आहे. त्यालाच खरेतर सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळायला हवे होते, अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत होते. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले. त्याने दुसऱ्या डावात १२७ धावा केल्या. पण शार्दूलच्या कामगिरीकडे पाहिले तर त्याची कामगिरी तेवढीच महत्त्वाची ठरली आहे.

पहिल्या डावात शार्दूलने ५७ धावांची सर्वोच्च खेळी केली. त्या डावात कर्णधार विराट कोहलीने ५० धावांची दुसऱ्या क्रमांकाची खेळी केली होती. शार्दूलच्या या खेळीमुळे भारताने १९१ धावांपर्यंत मजल मारली होती. तो जेव्हा मैदानात उतरला तेव्हा भारताची स्थिती ६ बाद ११७ होती, पण भारताने १९१ धावा केल्या. शार्दूलच्या या ५७ धावांच्या खेळीत ७ चौकार आणि ३ खणखणीत षटकारांचा समावेश होता. म्हणजेच उभ्या उभ्या त्याने ४६ धावा केल्या.  इंग्लंडच्या पहिल्या डावात सर्वोच्च खेळी करणाऱ्या ऑली पोप (८१) याचा अडथळा शार्दूलने दूर केला.

हे ही वाचा:

कोरोना काळात फुलविक्रेत्यांचे चेहरे कोमेजले!

५० कोटींचा दावा खुशाल टाकावा, मी घाबरत नाही

बांधवगडमधील हत्तींना १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी! काय आहे बातमी वाचा…

मेहबूब सारखे बलात्कारी मोकाट वावरत असल्याने विकृत निर्ढावलेले

दुसऱ्या डावात शार्दूलने ६० धावांची खेळी केली त्यातही त्याने ७ चौकारांची आतषबाजी केली आणि एक षटकार लगावला. शिवाय गोलंदाजीतही दोन बळी घेतले. त्यात जो रूटचा महत्त्वाचा अडसर त्याने दूर केला.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात झालेल्या मालिकेतही अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीतही शार्दूलने कमाल खेळी केली होती. दोन डावात मिळून त्याने ७ बळी घेतले होते आणि ६७ धावांची खेळीही केली होती.

Exit mobile version