महाराष्ट्रासह मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक रांगेत उभे आहेत. भाविकांसह राज्यातील नेतेमंडळी देखील दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. मात्र, शरद पवार यांच्या दर्शनावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे. शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेणं म्हणजे ढोंगीपणा, असे भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांच्या लालबाग दर्शनावर आक्षेप घेत म्हणाले, ४० वर्षानंतर शरद पवार रायगडावर गेले होते आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ३० वर्षानंतर पुन्हा लालबागच्या दर्शनाला पुन्हा शरद पवार या ठिकाणी आलेले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर का होईना रायगडाची, लालबागच्या राजाची आठवण शरद पवारांना आलेली आहे.
हे ही वाचा :
‘सनातन धर्म…’ च्या मराठी आवृत्तीचे लालबागच्या राजाच्या दरबारी प्रकाशन
कर्नाटकातील कलबुर्गीत राममंदिराच्या संकल्पनेवरील श्रीगणेश !
आता ‘IC814- द कंदहार हायजॅक’ वर ‘एएनआय’ कडून खटला
‘मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना अटक करा’
ते पुढे म्हणाले, मी लालबागच्या राजाला प्रार्थना करतो की, हिंदुत्वाच्या बाबतीत यांना सुबुद्धी देवो. परंतु ज्ञानेश्वर महाराव यांनी शरद पवार यांच्यासमोर प्रभू रामाचा, विठू रायाचा, हिंदुत्वाचा अपमान केला यावर काही न बोलता दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जायचे, हे म्हणजे निवडणुकीच्या दृष्टीने का होईना, नौटंकी का होईना, लालबागच्या राजाने यांना सुबुद्धी दिलेली आहे. मात्र, महाराष्ट्रातील जनतेला यांचे ढोंगी प्रेम, ढोंगी श्रद्धा निश्चितच समजून येतात, असे प्रवीण दरेकर म्हणाले.