पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवार, १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येत असून या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून विरोध आहे. मात्र, तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे मात्र नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित आहेत.
यावेळी मंचावर एक वेगळाच प्रसंग जनतेला पाहायला मिळाला. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिरातील पूजा आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा एस पी कॉलेज मैदानाकडे निघाला. कार्यक्रमाच्या मंचावर नरेंद्र मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहत मोदींचे स्वागत केले. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्वांना अभिवादन करत नरेंद्र मोदी हे जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा शरद पवारांनी हस्तांदोलन करत मोदींचे स्वागत केले. यावेळी काही क्षण दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली आणि शरद पवारांनी हसून नरेंद्र मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य दिसून आले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली या प्रश्नावर आता चर्चा घडू लागक्या आहेत.
नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचे लोकार्पण तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या हजारो घरांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. या दरम्यान शरद पवारांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी अपेक्षा राज्यातील विरोधी बाकावर बसलेल्या पक्षांकडून करण्यात येत होती. मात्र, तरीही शरद पवार हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने महाविकास आघाडीत नाराजी असल्याचे चित्र आहे.
हे ही वाचा:
काँग्रेसचे विजय वड्डेटीवार यांची विरोधी पक्षनेते पदी नियुक्ती
जसप्रीत बुमराहचे पुनरागमन; आयर्लंड विरुद्ध भारत टी- २० मालिकेसाठी कर्णधारपदी नियुक्ती
एलपीजी सिलेंडर १०० रुपयांनी स्वस्त
ठाण्यात गर्डर लाँचर कोसळून १७ जणांचा मृत्यू
सामनामध्येही शरद पवारांच्या उपस्थितीवरून टीका करण्यात आली आहे. महिन्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनीच शरद पवारांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. तरीही, शरद पवार मोदींचे स्वागत करणार हे लोकांना आवडले नाही. शरद पवार गैरहजर राहिले असते तर त्यांचे नेतृत्व, हिंमत यास सह्याद्रीने दाद दिली असती, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.