रोहितने शमीला एकच षटक दिले आणि भारताने सामनाच जिंकला

अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज बाद

रोहितने शमीला एकच षटक दिले आणि भारताने सामनाच जिंकला

जसप्रीत बुमराहच्या ऐवजी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीच्या हाती रोहित शर्माने चेंडू दिला. ते होते ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० वर्ल्डकप सराव सामन्यातले अखेरचे षटक. ऑस्ट्रेलियाला हव्या होत्या ११ धावा आणि अनुभवी शमी गोलंदाजी करायला आला. शमीने सामन्याचे चित्र ज्या पद्धतीने बदलले ते पाहता सर्वांच्याच भुवया उंचावल्या. भारताने सामना ६ धावांनी जिंकला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने १९व्या षटकात ६ बाद १७६ अशी मजल मारली होती. त्यामुळे आणखी ११ धावांची त्यांना गरज होती. बुमराहच्या ऐवजी संघात आलेल्या शमीच्या हाती कर्णधार रोहित शर्माने चेंडू सोपविला आणि चमत्कारच घडला. शमीच्या या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर प्रत्येकी दोन धावा ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने घेतल्या. आणखी ७ धावांची ऑस्ट्रेलियाला गरज होती. त्यानंतर मात्र चमत्कार घडला. तिसऱ्या चेंडूवर कमिन्सचा झेल विराट कोहलीने लाँग ऑनला टिपला. एका हाताने झेल घेत कोहलीने सामन्यातली रंगत वाढविली. पुढच्या चेंडूवर ऍस्टन ऍगर धावचीत झाला. आता राहिले दोन चेंडू. शमीने यॉर्कर चेंडू टाकत इंग्लिसला त्रिफळाचीत केले. आता ऑस्ट्रेलिया पराभूत होणार हे निश्चित झाले. एका चेंडूवर सात धावांची गरज होती. शमीने केन रिचर्डसनला यॉर्कर टाकला आणि त्याचाही त्रिफळा उडविला. भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

त्याआधी, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १८६ धावा केल्या. त्यात सलामीवीर के.एल. राहुलने ५७ धावांची खेळी करताना ६ चौकार आणि ३ षटकार लगावले. तर मुंबईकर सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूंत ५० धावांची झंझावाती खेळी करताना १ षटकार आणि ६ चौकार लगावले. केन रिचर्डसनने ३० धावांत ४ बळी घेतले.

हे ही वाचा:

नायजेरियात महापुराची तयारीच नसल्याने गमावले शेकडो जीव

खोटी बातमी दिल्याप्रकरणी लोकसत्ता, संपादक गिरीश कुबेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदींकडून दिवाळी भेट

बनावट मॅरेथॉन आयोजनाने स्पर्धक खवळले, आयोजकानेच केली आत्महत्या

 

भारताच्या या धावसंख्येला उत्तर देताना ऍरन फिंचने ७६ धावा केल्या पण त्याला इतरांची साथ लाभली नाही. ५ बाद १७१ अशी स्थिती असताना ऑस्ट्रेलियाची अशी काही घसरगुंडी उडाली की, त्यांचे उर्वरित फलंदाज पुढील ९ धावांत माघारी परतले.

स्कोअरबोर्ड

भारत २० षटकांत ७ बाद १८६ (राहुल ५७, सूर्यकुमार ५०, रिचर्डसन ३०-४) विजयी वि. ऑस्ट्रेलिया २० षटकांत १८० (फिंच ७६, मार्श ३५, शमी १-०-४-३).

Exit mobile version