सरकारने वाईन सर्वसामान्य दुकानात आणली…म्हणून त्यांनी परत केला पुरस्कार

सरकारने वाईन सर्वसामान्य दुकानात आणली…म्हणून त्यांनी परत केला पुरस्कार

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मॉल व सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या धोरणाचा निषेध म्हणून शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे त्यांना २०१७ साली व्यसनमुक्ती क्षेत्रात केलेल्या कायार्चा गौरव म्हणून शासनाचा महात्मा गांधी यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार त्यांनी परत केला आहे.

वाईन निर्णयाच्या निषेधार्थ शाहीर हेमंतराजे मावळे यांनी त्यांना व्यसनमुक्तीबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने परत केला आहे. आणि आज पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या इथे हा पुरस्कार ठेवला. त्यावेळी महाराष्ट्र शासनाची सद्सदविवेकबुद्धी जागी होवो अशी प्रार्थनादेखील त्यांनी केली आहे. त्यावेळी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी मावळे यांच्यासोबत सहभाग घेतला होता. आणि उद्या हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांना परत करण्यात येणार आहे, असे यावेळी मावळे म्हणाले.

हे ही वाचा:

…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!

या मंत्र्याने म्हटले, २०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतात!

“नथुरामने गांधींचा ‘वध’ केला”

‘संजय राऊत यांची वाइन उद्योगात मोठी गुंतवणूक’

मावळे यांनी पुरस्कार का परत केला?

वाईन आत्ता सर्वसामान्य दुकानात मिळणार आहे. वाईन ही दारू आहे का नाही त्यात काहीही अर्थ नाही. जे चूक आहे ते चूकच आहे. वाईन पिणं हे देखील चुकीचं आहे. गेल्या ४० वर्षांहून अधिक काळापासून लहान मुलांवर आम्ही शाहिरीच्या माध्यमातून संस्कार करत आलो आहे. आत्ता सरकारचं दुकानांमध्ये वाईन आणत असेल ते निषेधार्थ आहे. शाहिरीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीबाबत नेहेमीच प्रबोधन करत आलो आहे. याबाबत हा राज्यशासनाचा पहिलाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला होता. पण सरकारच्या या निर्णयामुळे ज्या मुलांवर संस्कार करणार आहोत. तेच मुलं उद्या जाऊन दुकानांमधून वाईन घेतील. हे चुकीचं असल्याने याच्या निषेधार्थ हा पुरस्कार मी शासनाला परत करत असल्याचे मत यावेळी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी व्यक्त केलं. सरकारने जो निर्णय घेतला आहे. तो अत्यंत चुकीचा असून याबाबत पुन्हा विचार करून हा वाईन बाबतचा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी देखील यावेळी मावळे यांनी केली.

या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारवर विरोधी पक्षाच्यावतीने जोरदार टीका करण्यात आली आहे. मात्र आघाडी सरकार वाईन ही दारू नसल्याचा दावा करत आहे.

Exit mobile version