वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

वर्ध्यात भीषण अपघात; आमदाराच्या मुलासह ६ विद्यार्थी ठार

वर्ध्यामध्ये सोमवारी मध्यरात्री भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या अपघातामध्ये सात तरुण जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे. हे सर्व तरुण मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून हे सर्व जण गाडी घेऊन बाहेर पडले होते. नदीच्या पुलावर हा भीषण अपघात झाला आणि गाडी नदीत पडली.

वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून हे सात मित्र महिंद्रा एक्सयूव्ही गाडी घेऊन बाहेर पडले होते.  हे सर्व विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहत होते. रात्री दहा वाजता हॉस्टेलमध्ये हजेरी घेतली जाते. तेव्हा विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसल्याचे लक्षात आले. त्वरित या घटनेची माहिती विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली. दरम्यान, वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबियांना कळवले होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणीही परत न आल्याने सर्वच चिंतेत होते. पहाटेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या भीषण अपघाती मृत्यूची बातमी समजली.     

वर्ध्यात नदीच्या पुलावर हा अपघात झाला. या अपघातात गाडी तब्बल चाळीस फूट खोल नदीत पडली. कारमधील सातही जण अपघातात जागीच ठार झाले. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती, की कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तब्बल चार तासांचा अवधी लागला. नदीच्या पुलावर असलेला संरक्षक कठडा तोडून कार थेट खाली कोसळली होती.

हे ही वाचा:

राज्यातील ८९ टक्के नमुने हे ओमायक्रोन बाधित; आठव्या चाचणीचे निष्कर्ष

रेल्वेचालक अडीच तास निवांत झोपला आणि गाडी लेट झाली!

व्हाय आय किल्ड गांधी चित्रपटावर बंदीची मागणी

शेअर बाजारात झोमॅटो, नायकाची झाली घसरण…

अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांपैकी एक जण महाराष्ट्रातला होता. महाराष्ट्रातील तिरोड्याचे आमदार रहांगडाले यांचा सुपुत्र आविष्कार रहांगडाले याचा मृत्यू झाला. तीन विद्यार्थी हे उत्तर प्रदेश आणि दोन बिहारचे होते, अशी माहिती त्यांनी दिली. तर एक विद्यार्थी हा ओदिशाचा होता. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव नीरज सिंह होते, त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती सावंगी मेडिकल कॉलेजचे ओएसडी अभ्युदय मेघे यांनी दिली आहे.

Exit mobile version