१५ जुलैपासून मुंबईत सेरो सर्वेक्षण

१५ जुलैपासून मुंबईत सेरो सर्वेक्षण

सर्व वयोगटांच्या अँटिबॉडीज तपासणार

मुंबईत येत्या १५ जुलैपासून पाचवे सेरो सर्व्हेक्षण सुरू होणार आहे. त्यांतर्गत सर्व वयोगटातील नागरिकांच्या अँटिबॉडीज तपासल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोना विरोधात मुंबईकरांमध्ये निर्माण झालेल्या प्रतिकारशक्तीचा अंदाज येणार आहे.

पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिका आणि काही संस्थांनी सेरो सर्वेक्षण केले होते. त्यात आलेल्या रक्त नमुन्यांमध्ये झोपडपट्टीत ५७ टक्के व बिगर झोपडपट्टी भागात १६ टक्के अँटीबॉडीजचे प्रमाण आढळून आले होते. सर्व्हेच्या दुसऱ्या टप्प्यात तीन वॉर्डांमध्ये सर्वेक्षणात ५,८४० जणांची तपासणी करण्यात आली होती. झोपडपट्टी भागांमध्ये सरासरी सुमारे ४५ टक्के व बिगर झोपडपट्टी भागांमध्ये सुमारे १८ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणात १० हजार १९७ नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले होते. यामध्ये ३६.३० टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडिज आढळल्या होत्या. सेरो सर्वेक्षणाच्या चौथ्या टप्प्यात १ एप्रिल ते १५ जून २०२१ या कालावधीत सर्व वॉर्डांमध्ये मुलांमध्ये सेरो सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात ५० टक्क्यांहून जास्त मुलांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. त्यामुळे पाचव्या टप्प्यात सर्व वयोगटांमध्ये किती टक्के अँटिबॉडीज आढळून येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंबईत बनावट लसीप्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट लस प्रकरणात ज्यांनी ज्यांनी लस घेतली होती, त्यांच्या रक्ताची चाचणी करण्यात येणार आहे. या लसीव्यतिरिक्त नागरिकांना नक्की कोणतं केमिकल देण्यात आलं यासाठी ही तपासणी होणार आहे. काहीजणांच्या रक्ताचे नमूनेही घेण्यात आले आहेत. २६०० लोकांना ही बनावट लस देण्यात आली होती. यातील बऱ्याच जणांना थकवा जाणवत असल्याच्या अद्याप तक्रारी येत आहेत. पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांच्या नेतृत्वात या सगळ्या प्रकरणाची एका विशेष पथकामार्फत चौकशी सुरू आहे. काल पोलिसांनी शिवम हॉस्पिटलमध्ये छापा टाकून या बनावट लसीच्या काही रिकाम्या व्हाईल्स जप्त केल्या असून त्या फॉरेन्सिकला पाठवण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

अजित पवारांच्या मामाचा कारखाना जप्त

बच्चू कडूंच्या पक्षाचा ठाकरे सरकारला पुन्हा घरचा आहेर

आरोग्य क्षेत्राचे बजेट दुप्पट केले

विधानसभा अध्यक्षपद निवडीच्या हालचालींना वेग

देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ४ लाख ११ हजार ६३४ वर गेला आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ९४ लाख ८८ हजार ९१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर ३ लाख ९९ हजार ४५९ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. ५ लाख २३ हजार २५७ इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ३३ कोटी ५७ लाख १६ हजार १९ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Exit mobile version