हिंदीभाषिक राज्यांची गोमूत्र राज्ये म्हणून अवहेलना करणारे द्रमुकचे खासदार सेंथिल कुमार यांची तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे सर्वेसर्वा एमके स्टॅलिन यांनी कानउघाडणी केली आहे. याबाबत पक्षाने मंगळवारी प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. यामध्ये पक्षाने कोणाही व्यक्तीने सार्वजनिकरीत्या बोलताना तारतम्य बाळगण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे.
जेव्हा मुख्यमंत्री स्टॅलिन यांना याबाबत कळले तेव्हा त्यांनी सेंथिल यांची कानउघाडणी केली, असे द्रमुकचे वरिष्ठ नेते आरएस भारती यांनी स्पष्ट केले. सेंथिल यांनी निवेदन जाहीर करून आपल्या विधानाबद्दल सार्वजनिकरीत्या माफी मागितली आहे, असे भारती यांनी सांगितले. त्यांनी हे वक्तव्य जाणुनबुजून केले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत सेंथिल यांनीही त्यांची बाजू मांडली आहे. ‘जेव्हा मी संसदेत हे विधान केले तेव्हा गृहमंत्री आणि भाजपचे खासदार तेथे उपस्थित होते. हे काही वादग्रस्त विधान नाही. मी पुढच्या वेळी वेगळे शब्द वापरण्याचा प्रयत्न करेन. मी माफी मागतो,’ असे स्पष्टीकरण सेंथिल यांनी दिले आहे.
हे ही वाचा:
नवी मुंबईतून ४८ तासांत सहा मुले बेपत्ता
लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख अदनान अहमदची कराचीमध्ये हत्या!
नवं सिम घेण्यासाठी डिजिटल केवायसी अनिर्वाय
१३ डिसेंबरपर्यंत संसदेवर हल्ला करण्याची खलिस्तानी दहशतवादी पन्नुची भारताला धमकी
नेमके काय म्हणाले, सेंथिल
चारपैकी तीन राज्यांत विधानसभा निवडणुका जिंकल्यावर सेंथिल यांनी संसदभवनात आपले मत मांडले. ‘भाजप केवळ हिंदीभाषिक राज्यांमध्येच विजय मिळवू शकतो. ज्यांना आम्ही गोमूत्र राज्ये म्हणतो, अशा हिंदीभाषिक राज्यांतच त्यांची ताकद आहे, याचा लोकांनी विचार केला पाहिजे,’ अशी टिप्पणी सेंथिल यांनी केली होती.