‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. कंपनीला निविदा मिळाल्याची माहिती

‘स्टॅचू ऑफ युनिटी’चे शिल्पकार राम सुतार सिंधुदुर्गात उभारणार महाराजांचा पुतळा

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना झाली होती. यावरून राजकीय वातावरण देखील गढूळ झाले होते. या दुर्घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची माफीही मागितली होती. या प्रकरणी काही जणांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर आता या प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे.

पुतळा दुर्घटनेनंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिल्याची माहिती समोर आली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने याआधी गुजरातमधील ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गार्नेट इंटिरियर्स आणि राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या दोन कंपन्यांनी पुतळ्याच्या कामासाठी निविदा दाखल केली होती. गार्नेट इंटिरियर्स या कंपनीने २०.९० कोटींची तर राम सुतार यांच्या कंपनीने ३६.०५ कोटींची निविदा दाखल केली. इतर बोलीदारांच्या कोटेशनची तुलना केल्यानंतर राम सुतार यांच्या कंपनीला २०.९५ कोटींमध्ये हे काम देण्यात आले आहे.

माहितीनुसार, कांस्य धातूपासून ६० फूट उंचीचा ८ मीमी जाडीचा पुतळा बनविण्याचे देण्यात आले आहे. पुतळा पेलण्यासाठी तीन मीटर उंचीचा मजबूत असा चौथरा बनविण्यात येणार आहे. निविदेनुसार १०० वर्ष टिकेल असा पुतळा बांधण्याची अट घातली गेली आहे. तर कंत्राटदार कंपनीने १० वर्ष पुतळ्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याचीही अट घातली आहे. आधी तीन फूट उंचीचे फायबर मॉडेल तयार केले जाईल. कला संचालनालयाने मान्यता दिल्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम हाती घेतली जाईल.

हे ही वाचा : 

‘ओपनएआय’वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचीर बालाजी यांचा अमेरिकेत आढळला मृतदेह

सीरियातून आलेल्या भारतीयांनी मानले मोदी सरकारचे आभार

हवाई दलाला मिळणार आणखी बळ; ताफ्यात दाखल होणार १२ सुखोई विमाने

सोमवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडणार

नौदल दिनाच्या निमित्ताने राजकोट येथे शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. हा पुतळा २६ ऑगस्टला कोसळला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी देखील मागितली होती.

Exit mobile version