ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार

महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात आला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात पुरुस्काराची घोषणा केली. रुपये २५ लाख रोख रक्कम, मानपत्र, मानचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राम सुतार हे १०० वर्षांच्या वयातही शिल्पकलेसाठी सतत कार्यरत आहेत. सध्या इंदू मिल येथे निर्माणाधीन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील शिल्प तयार करण्याचे कार्यही ते करीत आहेत. त्यांचे अद्वितीय योगदान लक्षात घेऊन १२ मार्च २०२५ रोजी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. त्यांचा जन्म इ.स.१९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे.

कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना २०१६ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला. त्यांच्याप्रमाणेच त्यांचा एकुलता एक मुलगा अनिल सुतार देखील एक शिल्पकार आहे. भारतातील रॉकेट प्रक्षेपण स्थळावर एक मूर्ती बनवायची असल्याचे अनिल सुतार यांनी यापूर्वी म्हटले होते.

हे ही वाचा :

अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!

दिशा सालियन प्रकरणातील याचिका पाच वर्षांनी दाखल का? वकील निलेश ओझा यांनी दिले स्पष्टीकरण

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले; दोन वेगळ्या चकमकींमध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

आयपीएल २०२५ : राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग करणार

राम सुतार यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार जाहीर होताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार ट्वीटकरत म्हणाले, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. राम सुतार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात शेकडो शिल्पे साकारली आहेत. त्यांचं प्रत्येक शिल्प अप्रतिम आणि सौंदर्याचा अद्भूत नमूना आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल या महामानवांच्या शिल्पातून त्यांनी देशाचा इतिहास जिवंत केला. या महामानवांचं कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचवले. गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’, देशाच्या संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा, दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, दादरला चैत्यभूमी येथे उभारण्यात येत असलेला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे त्यांच्या कलाकौशल्याप्रमाणेच या महामानवांवरील प्रेमाचं आणि आदराचं प्रतिक आहे.

शिवसेनेचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचे अभिनंदन केले आहे. भारतातील सर्वात वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि कलातपस्वी शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांना २०२४ चा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सन्मान्य पुरस्कार जाहीर केल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे. जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा निर्माण करून देशाच्या अस्मिताचिन्हाचा यथोचित गौरव करणारे राम सुतार हे शिल्पकलेच्या क्षेत्रातील भीष्माचार्य आहेत. आपली सारी कला आणि सर्जनशीलता भारतीय संस्कृती आणि परंपरांची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समर्पित करणाऱ्या कलामहर्षी सुतार यांचे या पुरस्कारासाठी मनःपूर्वक अभिनंदन, आणि त्यांच्या कलासाधनेला शतशः प्रणाम, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

 

Exit mobile version