पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति सौरभ प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार-२०२३ प्रदान करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयातून आनंदाचा झरा लोकांपर्यंत पोहोचवला असे सांगून मुनगंटीवार म्हणाले, त्यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटले जाते. समोरच्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे, प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचे कठीण कार्य त्यांनी अनेक वर्ष केले. त्यांनी आपल्या अभिनयातून समाजातील संस्कारही प्रकट केला, तर दुसरीकडे प्रशासनातील दोषही तेवढ्याच ताकदीने मांडले. अभिनयासोबत त्यांची शब्दफेकही ताकदीची आहे, असेही ते म्हणाले.
आज बाबासाहेब पुरंदरे जरी नसले तरी प्रत्येक घरात शिवाजी महाराजांचे जीवनकार्य पोहोचविण्याचे कार्य करणे ही त्यांना आदरांजली ठरेल, असे नमूद करून मुनगंटीवार म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक घरात पोहोचवला तर समाजात चांगली व्यक्तिमत्वे निर्माण होतील आणि देशाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. यादृष्टीने संशोधकाच्या भूमिकेतून प्रसाद तारे यांनी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पुस्तकरूपाने मांडल्याबद्दल त्यांनी लेखकाचे अभिनंदन केले.
महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने छत्रपतींची वाघनखे परत देण्याची विनंती ब्रिटिश म्युझियमने मान्य केली आहे, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
अशोक सराफ म्हणाले, कलेच्या क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करत असताना कलाकाराला मिळणारे प्रेक्षकांचे पाठबळ महत्वाचे आहे, याशिवाय कलाकाराचे प्रयत्न व्यर्थ आहेत. असे पाठबळ कायम महाराष्ट्राच्या रसिकांनी दिले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’च्या रूपाने उभ्या केलेल्या नाट्यशिल्पाला तोड नाही. या नाटकात बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेला आवाज देऊन या नाटकाशी आपण जोडले गेलो. त्यांच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराच्या रूपाने बाबासाहेबांना मी आपल्या घरात घेऊन जातो आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
हे ही वाचा:
बद्रीनाथ महामार्गावरील ७० मीटरचा रस्ता खचला
भारताने विकसित केलेली AI आधारित ‘भाषिणी’ लवकरच येणार
रजनीकांतचा नवा चित्रपट पाहणार योगी; लखनऊमध्ये होणार शो
रतन टाटा महाराष्ट्राचे पहिले ‘उद्योगरत्न’
अशोकमामांविषयी प्रत्येकाच्या मनात आदराचे स्थान आहे असे नमूद करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, अशोक सराफ यांची कामगिरी सतत उंचावत गेली. त्यांनी जीवनात यशाची अनेक शिखरे गाठली. त्यांची नाटके हमखास यशस्वी ठरायची. त्यांचे अनेक चित्रपट, नाटके यशस्वी ठरले. आज कर्तृत्व आणि नम्रता एकाच ठिकाणी आढळत नाही, असे सुंदर मिश्रण अशोक सराफ यांच्या व्यक्तिमत्वात आणि बोलण्यात जाणवते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजाच्या भल्यासाठी अनेक माणसे चांगले काम करीत असल्याची खात्री पटते, असे त्यांनी सांगितले.
उच्च शिक्षण विभागाने संशोधनावर भर दिला असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधनासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही देऊन लेखक प्रसाद तारे यांचे त्यांनी अभिनंदन केले. कीर्ति सौरभ प्रतिष्ठानच्या आगामी ‘श्रीमंत योगी’ नाटकाला सहकार्य करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी रावत, लेखक प्रसाद तारे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रसन्न परांजपे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज घरोघरी पोहोचावेत असा प्रतिष्ठानचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य प्रसाद तारे यांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शिष्यवृत्तीचा धनादेश प्रदान करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज-व्यक्तिमत्वाचे भावदर्शन’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.