मराठी चित्रपटक्षेत्रातील जुन्या काळातील अभिनेत्री रेखा कामत यांचे मंगळवारी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्यात ८९ वर्षांच्या होत्या. माहीम येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
गेली ६० वर्षे त्या कलेच्या क्षेत्रात कार्यरत होत्या. कृष्णधवल चित्रपटांच्या काळापासून ते अगदी आताच्या काळातील काही चित्रपट, मालिका यात भूमिका करताना त्यांनी कलाक्षेत्राची सेवा केली. नाटक, मालिका, चित्रपट यातून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.
रेखा कामत यांचे मूळ नाव कुमुद सुखटणकर असे होते. शैक्षणिक जीवनात त्यांनी कथ्थक, भरतनाट्यमचे धडे गिरविले आणि त्याचा त्यांना अभिनयक्षेत्रासाठी उपयोग झाला. दादरच्या इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. नृत्यात स्वतःची छाप पाडतानाच त्यांनी गायनाचे धडेही गिरविले. भानुदास मानकामे, घोडके गुरुजी यांच्याकडून त्यांनी गायनकला आत्मसात केली. अभिनय क्षेत्रासाठी आवश्यक असलेली सगळी गुणवैशिष्ट्ये त्यांच्यापाशी होती.
हे ही वाचा:
निवडणुकांत शिवसेनेला सोबत न घेण्याचा ‘राष्ट्रवादी’ प्रयोग!
भर बर्फात बॉलीवूड गाण्यावर सैन्याचे कदमताल
कुस्तीगीराच्या हत्येआधी सुशीलकुमारने स्टेडियममध्ये कुत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या…
कर्ज द्यायला नकार, पेटवून दिली बँक
रेखा कामत यांनी ऋणानुबंध, गोष्ट जन्मांतरीची, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुझे आहे तुजपाशी, गंध निशिगंधाचा, संगीत एकच प्याला, प्रेमाचा गावा जावे, दिल्या घरी तू सुखी राहा, मला काही सांगायचे आहे, लग्नाची बेडी, सुंदर मी होणार, संगीत सौभद्र अशा नाटकांत त्यांनी भूमिका केल्या. त्यांचे अनेक चित्रपट गाजले. अगं बाई अरेच्चातील त्यांची आजीची भूमिका अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे. कुबेराचं धन, गृहदेवता, लाखाची गोष्ट अशा चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. एका लग्नाची दुसरी गोष्ट, प्रपंच, माणूस, याला जीवन ऐसे नाव, सांज सावल्या या मालिकांमध्ये त्यांच्या भूमिकांनी छाप पाडली होती.