सेहवाग म्हणतो, जर्सीवर ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव असावं

भारत की इंडिया वादात सेहवागची उडी

सेहवाग म्हणतो, जर्सीवर ‘इंडिया’ नव्हे ‘भारत’ नाव असावं

एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवार, ५ सप्टेंबर रोजी करण्यात आली. दरम्यान, राजकीय वर्तुळात देशाचं नाव भारत की इंडिया याबाबत चर्चेला उधाण आले आहे. भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने जी-२० परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या आमंत्रणात प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे तर प्रेसिडेन्ट ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने या चर्चेत सहभाग घेत आपले मत मांडले आहे.

“१९९६ साली नेदरलँड संघ भारतात हॉलंड या नावाने वर्ल्डकप खेळण्यासाठी आला होता. २००३ मध्ये जेव्हा आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा त्यांचं नाव नेदरलँड झालं होतं. आताही तेच लागू आहे. बर्मा हे नाव ब्रिटीशांनी दिलं होतं आता त्याचं नाव म्यानमार आहे. अशीच अनेक मूळ नावे समोर येत आहेत,” असे ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केलं आहे.

“तुमचा ऊर अभिमानाने भरून यावा अशाच नावाचं मी समर्थन करेनं. आपण भारतीय आहोत. इंडिया हे नाव ब्रिटीशांनी दिलं आहे. त्यामुळे भारत हे नाव लागू केलं पाहीजे. मी बीसीसीआय आणि जय शाह यांना विनंती करतो की जर्सीवर भारत हे नाव असावं”, असं ट्वीट वीरेंद्र सेहवाग याने केलं आहे.

बीसीसीआयच्या ट्वीटवरही त्यांनी नावाची चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. टीम इंडिया नाही तर टीम भारत असं लिहिण्याची विनंती केली. यामुळे वीरेंद्र सेहवाग याच्यावर काही जणांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे तर काहींनी टीका केली आहे.

तर, ही भूमिका घेतली असली तरी राजकारण करण्यात काहीच रस नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. दोन्ही निवडणुकीत भारतातील मोठ्या पक्षांसोबत होतो. मी खेळाडूच्या भावनेने हे पाहतो. त्यामुळे यात राजकारण आणि वैयक्तिक अहंकार आणण्याची गरज नाही, अशी भूमिका वीरेंद्र सेहवाग याने स्पष्ट केली आहे.

हे ही वाचा:

विश्वचषक २०२३ साठी धवन, तिलकला डच्चू; सूर्यकुमार, श्रेयसला संधी

आदित्य एल १ पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत स्थिरावले

प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे प्रेसिडेन्ट ऑफ भारत

ट्रेनी एअर होस्टेसची हत्या केल्यानंतर आरोपीने कपडे बदलले! सीसीटीव्हीत झाले उघड

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे ट्वीट चर्चेत 

या सर्व चर्चांमध्ये बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ही ट्वीट केले आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘भारत माता की जय’ असं ट्विट केलं आहे. त्याचसोबत त्यांनी भारताचा तिरंगा आणि लाल झेंड्याचा इमोजी पोस्ट केला. अमिताभ बच्चन हे सहसा राजकारणापासून दूरच असतात. त्यामुळे त्यांनी केलेलं ट्विट विशेष चर्चेत आलं आहे.

भारताच्या राष्ट्रपतींच्या नावाने जी-२० परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या आमंत्रणात प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया नव्हे तर प्रेसिडेन्ट ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे चर्चा देशभरात सुरू झाली आहे. काँग्रेसने यासंदर्भात केंद्र सरकारवर टीका केली आहे. संविधानात भारताचा उल्लेख इंडिया असा आहे. मात्र, आता त्याजागी भारत असा उल्लेख बदलला जाण्याची शक्यत आहे. १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संसदेचे विशेष अधिवेशन होत असून त्यात या मुद्द्यावर चर्चा होण्याची आणि इंडियाऐवजी भारत असे नाव बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version