छत्तीसगडमधून मोठी बातमी समोर आली असून येथे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी बिजापूर जिल्ह्यात २० हून अधिक नक्षलवाद्यांना अटक केली आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उसूर, जांगला आणि नेल्सनार पोलिस स्टेशन परिसरात आमच्या पथकाने २२ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. या सर्वांना वेगवेगळ्या कारवाईत अटक करण्यात आली आहे.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, मंगळवारी (१५ एप्रिल) उसूर पोलिस ठाण्यातून जिल्हा पोलिस दल आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियनला गस्तीसाठी पाठविण्यात आले होते. या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी टेकमेटला गावातील जंगलातून ७ नक्षलवाद्यांना अटक केली. या सर्व अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून टिफिन बॉम्ब, कार्डेक्स वायर, इलेक्ट्रिक वायर आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
हे ही वाचा :
‘बाबरी मशिद शहीद झाल्यानंतर आम्ही दंगली घडवल्या’
कोळसा आयातदारांसाठी नोंदणी शुल्कबद्दल चांगला निर्णय
“पाकिस्तानचा काश्मीरशी एकमेव संबंध म्हणजे बेकायदेशीरपणे व्यापलेला प्रदेश रिकामा करणे”
ते पुढे म्हणाले, त्याच प्रकारे, जिल्ह्यातील जंगला पोलिस ठाण्यातील जिल्हा पोलिस, जिल्हा राखीव रक्षक (DRG) यांचे संयुक्त पथक बेलचर, भुर्रीपाणी आणि कोटमेटा गावांकडे गस्त घालण्यासाठी गेले आणि या कारवाईदरम्यान, सुरक्षा दलांनी बेलचर गावाच्या जंगलातून आणखी ६ नक्षलवाद्यांना पकडले. या नक्षलवाद्यांच्या ताब्यातून टिफिन बॉम्ब, कार्डेक्स वायर, डेटोनेटर्स, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी, खोदकामाची साधने आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
याच शोधमोहिमेअंतर्गत नेल्सनार पोलिस ठाण्यातील एक पथकही कांडकारका गावाकडे पाठवण्यात आले, जिथे सुरक्षा दलांनी कांडकारकाच्या जंगलातून ९ नक्षलवाद्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून टिफिन बॉम्ब, कॉर्डेक्स वायर, डेटोनेटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी, खोदकामाची साधने, नक्षल साहित्य आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, परिसरात नक्षलवाद्यांविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे.