संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर

बुटातून स्मोक कँडल काढत केला सभागृहात धूर, पोलिसांकडून चार जणांना अटक

संसदेवरील हल्ल्याला २२ वर्षे झाली; त्याचदिवशी संसदेत शिरले दोन घुसखोर

नवीन संसद भवनात हिवाळी अधिवेशन चालू असताना दोन तरुणांनी संसेदत शिरकाव करत धुडगूस घातला.संसदेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या.त्यामुळे लोकसभेत एकच खळबळ उडाली.तरुणांनी लोकसभा सभागृहात लक्ष वेधण्यासाठी स्मोक कॅडलचा वापर केला.त्यामुळे सभागृहात पिवळा धूर पसरला.हा संपूर्ण प्रकार काही सेकंदात घडला.विशेष म्हणजे २००१ साली १३ डिसेंबर रोजीच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता.त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन तरुणांनी सभागृहात प्रवेश केला.भाजप खासदार खरगेन मुर्मू यांचं भाषण चालू असतानाच दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून खाली लोकसभेत उड्या मारल्या. लोकसभेत त्यांनी लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल्स जाळल्या.लोकसभेचे कामकाज चालू असताना अचानक असा प्रकार घडल्याने खासदारांची एकच धावपळ उडाली.दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.म्हैसूर येथील सागर शर्मा तर दुसरा मनोरंजन अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.

तसेच संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक महिला आहे तर दुसरा पुरुष आहे.हे दोघे संसदेबाहेर स्मोक कँडल्सचा वापर करून निषेध करत होते. नीलम (४२) असून दुसरा अमोल शिंदे (२५) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.ताब्यात घेण्यात आलेला अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.

महत्वाचे म्हणजे, १३ डिसेंबर रोजी २००१ साली संसदेवर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सुरक्षा जवानांसह नऊ जणांनी बलिदान दिले होते.या घटनेला २२ वर्ष पूर्ण झाली.आज सकाळी पंतप्रधान मोदी यांनी शूरवीरांना श्रद्धांजली वाहिली होती.तसेच राष्ट्रपती मुर्मू यांनी दहशतवाद्यांचा नायनाट करण्याची शपथ घेतली होती.मात्र, आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून आले. बुधवारी झालेल्या या घुसखोरीमुळे पुन्हा २२ वर्षांपूर्वीच्या त्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

हे ही वाचा:

संसदेच्या हल्ल्याला २२ वर्ष पूर्ण; पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली!

जम्मू काश्मीरमध्ये बांधला जातोय दहशतवाद्यांसाठी भलामोठा तुरुंग

‘तुमच्याकडे किती खलिस्तानी राहतात?’

महादेव बेटिंग ऍपच्या मालकाला दुबईत ठोकल्या बेड्या

दरम्यान, दोन तरुणांनी लोकसभेत प्रवेश करत धुडगूस घातल्याने लोकसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले आणि खासदारांना बाहेर काढण्यात आले.ताब्यात घेण्यात आलेला सागर शर्माकडे म्हैसूरचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास असल्याचे आढळून आले.

संसदेबाहेर पडल्यानंतर खासदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसभेतील गोंधळ आणि दहशतीच्या दृश्यांचे वर्णन केले.खासदारांनी सांगितले की, भाजप खासदार खरगेन मुर्मू बोलत असताना एका व्यक्तीने प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली.त्याच्या पाठोपाठ दुसरा माणूस आला आणि गॅलरीतून उडी मारली.या दोघांना पकडण्यासाठी काही खासदार पुढे सरसावत होते तेव्हा या दोघांनी सभागृहातील बेंचवरुन उड्या मारायला सुरुवात केली.त्या क्षणी त्यांनी आपल्या बुटातून स्मोक कँडल्स फोडले आणि सर्वत्र ठिकाणी फिरवले.त्या स्मोक कँडल्स मधून रंगीबेरंगी वायू बाहेर पडला.त्यामुळे लोकसभेत एकच गदारोळ झाला आणि खासदारांची धावपळ सुरू झाली.त्या दोघांना आता ताब्यात घेतले असून त्यांना जवळच्या पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की , त्यांनी फवारलेल्या गॅसमुळे डोळे,नाक, तोंडात जळजळ होत आहे.तृणमूल काँग्रेसचे नेते काकोली दस्तीदार यांनी सांगितले की, तरुणांनी घोषणाबाजी केली आणि गॅस फवारणी केली.काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले, अचानकपणे सुमारे २० वर्षीय दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी घेतली आणि त्यांच्या हातात कॅन होते.त्या कॅनमधून पिवळा धूर निघत होता.त्यापैकी एकाने सभापतींच्या खुर्चीकडे धावण्याचा प्रयत्न केला. काही घोषणा देत होते.कॅनमधून भर पडणारा धूर विषारी असू शकतो.हे सुरक्षेचे गंभीर उल्लंघन आहे, विशेषत: १३ डिसेंबर रोजी, ज्या दिवशी २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाला होता, असे ते म्हणाले.

सभापतींनी चौकशीचे दिले आश्वासन
जेव्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आश्वासन दिले आणि हा धूर “सामान्य प्रकारचा” असल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे.दिल्ली पोलिसांना तशा आवश्यक सूचनाही देण्यात आल्या आहेत.प्राथमिक तपासात हा केवळ धूर होता, त्यामुळे धुराबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, २५ नोव्हेंबर २०१६ रोजी अशीच एक घटना घडली होती.एका व्यक्तीने लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारण्याचा प्रयत्न केला होता.सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती.सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाच्या निषेधार्थात त्याने हे कृत्य केले होते.

 

Exit mobile version