संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार असतानाच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी नवीन संसदेत मिळालेल्या राज्यघटनेच्या प्रतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘या राज्यघटनेच्या प्रतीमधून समाजवादी-धर्मनिरपेक्ष हे शब्द गायब आहेत,’ असा नवा आरोप त्यांनी केला आहे.
‘राज्यघटनेच्या ज्या नव्या प्रती आम्हाला १९ सप्टेंबर रोजी देण्यात आल्या, ज्या प्रती आम्ही आमच्या हातात घेऊन नवीन संसदेच्या इमारतीत प्रवेश केला. त्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘सोशलिस्ट-सेक्युलर म्हणजेच समाजवादी-धर्मनिरपेक्ष’ हा शब्द वगळण्यात आला आहे,’ असा दावा अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.
हे ही वाचा:
कॅनडाला भारताशी पंगा भारी पडणार; आर्थिक फटका बसण्याची शक्यता
जस्टिन ट्रुडो म्हणे, ‘भारताला चिथावण्याचा विचार नाही’
नागपूर विमानतळावर ८७ लाखांच्या सोन्यासह दोघांना अटक !
‘पाकिस्तानच्या नशिबी चपातीचा तुकडाही नाही, पंतप्रधान चीनकडे भीक मागत आहेत’
‘आम्हाला माहीत आहे की, हे शब्द सन १९७६मध्ये एका अभ्यासाअंती राज्यघटनेत जोडण्यात आले होते. मात्र आज जर कोणी आम्हाला राज्यघटना देत असेल आणि जर त्यात हे शब्द नसतील, तर हा खूप चिंतेचा विषय आहे,’ असे चौधरी यांनी नमूद केले. याबाबत राहुल गांधी यांनाही आपण सांगितले असल्याचे चौधरी म्हणाले.
‘आता याबाबत आपण काही बोलण्याचा प्रयत्न केला, तर ते सांगतील, सुरुवातीपासून जे काही होते, तेच दिले जात आहे. मात्र त्यांचा हेतू वेगळाच आहे. त्यामुळेच आम्हाला भीती वाटते आहे. आम्हाला चिंता वाटते आहे. राज्यघटनेत आम्हाला जे दिले गेले आहे, त्यातून त्यांनी समाजवादी-धर्मनिरपेक्ष हे शब्द मोठ्या चलाखीने हटवले आहेत. हा आमच्यासाठी मोठा चिंतेचा विषय आहे,’ अशी भीती चौधरी यांनी व्यक्त केली. त्यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना संधी मिळाली नाही, असाही दावा चौधरी यांनी केला.