चीनपासून पूर्व सीमांना असलेल्या धोक्याला प्रत्युत्तरादाखल भारतीय हवाई दलाने पश्चिम बंगाल येथील हसीमारा विमानतळावर राफेलची तुकडी तैनात करण्याचे निश्चित केले आहे. हसीमारा विमानतळाच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थानामुळे, हा तळ हवाई दलासाठी सामरिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
हा विमानतळ भूतान सीमेच्या जवळ आहे. या तळापासून जवळच, भूतानच्या चुंबी खोऱ्यात भारत-भूतान-चीन या तिनही देशांच्या सीमा एकत्र येतात ती जागा आहे. हा भाग म्हणजेच २०१७ मध्ये भारत-चीन समोरासमोर उभे ठाकले ते डोकलाम आहे. हा बिंदू तिनही देशांसाठी चिंतेचा विषय आहे.
हवाई दलातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या महिन्याभरात राफेलची दुसरी तुकडी हसीमारा या मेन ऑपरेटिंग बेसवर तैनात करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
“भारतात मार्च अखेरपर्यंत १७ राफेल विमाने येणार”- राजनाथ सिंग
राफेल विमानांची पहिली तुकडी अंबाल्याला तैनात करण्यात आली आहे. पहिली राफेल विमाने २९ जुलै २०२० रोजी भारतात दाखल झाली होती. अंबाला इथेच त्यांचा १० सप्टेंबर रोजी १७ गोल्डन ऍरो स्क्वाड्रनमध्ये समावेश करून घेण्यात आला. भारतीय हवाई दलाने पश्चिमेला पाकिस्तानकडून आणि पूर्वेला चीनकडून असलेला धोका लक्षात घेऊन १८ विमानांची प्रत्येकी एक स्क्वाड्रन अनुक्रमे अंबाला आणि हसीमारा विमानतळावर तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
भारताने फ्रान्सकडे एकूण ३६ विमानांची मागणी केली आहे. त्यापैकी आत्तापर्यंत ११ विमाने पोहोचली आहेत. अजून सहा विमाने या महिनाअखेरपर्यंत दाखल होतील. उर्वरीत विमाने एप्रिल २०२२ पर्यंत भारतात येणार आहेत. या विमानांमुळे भारतीय हवाई दलाला नवे बळ मिळणार आहे. हसीमारा विमानतळांवर यापूर्वी मिग-२७ची स्क्वाड्रन होती, मात्र आता मिग-२७ विमानांना निवृत्त करण्यात आले आहे.
विमानांमधील ४.५व्या पिढीच्या या विमानांसाठी भारताने फ्रान्ससोबत सरकारी पातळीवर करार केला होता. राफेलच्या ३६ विमानांसाठी ₹५८,००० कोटींचा करार करण्यात आला होता.
हॅमर मिसाईल वाहून नेण्याची क्षमता असलेले विमान, नजरे टप्प्याच्या पलिकडच्या लक्ष्याचा भेद करण्यास देखील सक्षम आहे. याशिवाय विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे हे विमान आहे. सध्या हवाई दलाच्या वैमानिकांचे या विमानांसाठी प्रशिक्षण चालू आहे.