जम्मू- काश्मीरमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला बुधवार, २५ सप्टेंबर रोजी पासून सुरुवात झाली आहे. तब्बल १० वर्षांनंतर जम्मू- काश्मीरमधील जनता मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान करत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सहा जिल्ह्यांतील २६ जागांसाठी मतदान सुरू आहे. बुधवरी २३९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे.
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी सहा जिल्ह्यांतील २६ जागांवर मतदान पार पडत आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या टप्प्यात काश्मीर खोऱ्यातील १५ विधानसभेच्या आणि जम्मू विभागातील ११ जागांवर मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यात २५.७८ लाख मतदार २६ जागांवर २३९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.
काश्मीरमधील श्रीनगर जिल्ह्यातील हजरतबल, खन्यार, हब्बाकडल, लाल चौक, चन्नापोरा, जदीबल, सेंट्रल शाल्टेंग आणि ईदगाह मतदारसंघात मतदान होणार आहे. बडगाम जिल्ह्यातील बडगाम, बिरवाह, खानसाहिब, चरार-ए-शरीफ आणि चदूरा ब्लॉकमध्ये मतदान सुरू आहे. याशिवाय गांदरबल जिल्ह्यातील कंगन आणि गांदरबल या दोन मतदारसंघातही मतदान होत आहे. जम्मू विभागात गुलाबगड, रियासी, श्री माता वैष्णो देवी, कालाकोट-सुंदरबनी, नौशेरा, राजौरी, बुधल, थन्नामंडी, सुरणकोट, पूंछ हवेली आणि मेंढार येथे मतदान होत आहे.
जम्मू-काश्मीरमधील दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलेले अनेक भाग संवेदनशील आहेत. या टप्प्यात समाविष्ट काश्मीरमधील बहुतांश जागांवर फुटीरतावाद्यांचा प्रभाव दिसून आला आहे. यामध्ये खानयार, जदीबल, लाल चौक, ईदगाह, हजरतबल आदींचा समावेश आहे. हे लक्षात घेऊन चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), जम्मू-काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव
‘धर्मनिरपेक्षता ही युरोपियन संकल्पना, भारतात याची गरज नाही’
‘विनेश फोगटने रडगाणे सांगण्याऐवजी माफी मागायला हवी होती’
विलेपार्ल्यात दोन अल्पवयीन मुलांना चोर समजून जबर मारहाण
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी २४ जागांसाठी मतदान झाले होते. दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी मतदान होत आहे. शेवटच्या टप्प्यात उर्वरित ४० जागांसाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.