पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जामसर तलावातील गाळ काढताना इ.स.पू ६ ते १२ व्या शतकातील काही शिल्पपट सापडले. हा तलाव पाणथळ क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.
मागील महिनाभर या ६.६ हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावातील गाळ काढण्याचे काम चालू होते. काही युध्दवीरांच्या आणि पंचमुखी गाईच्या प्रतिमा असलेले शिल्पपट सापडल्यानंतर काम थांबवण्यात आले. गावकऱ्यांनी जव्हार तालुका तहसीलदार संतोष शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या स्थळाला भेट दिल्यानंतर पुरातत्त्व विभागाशी संपर्क केला. ए.एस.आय संशोधनानंतर या बाबतीत अधिक माहिती देऊ शकेल. या बाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, अशाच प्रकारचे काही शिल्पपट यापूर्वी १९८६ मध्ये देखील सापडले आहेत.
भारतात नव्याने शोधण्यात आलेल्या ८६ नव्या पाणथळक्षेत्रांपैकी एक हा तलाव असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळले. या तलावाचा समावेश भारतीय अवकाश संशोधन संस्था (आय.एस.आर.ओ.)ने बनविलेल्या पाणथळक्षेत्र सूचीमध्ये करण्यात आला होता.
जव्हार हे पुर्वी मुकणे राज्यांचे संस्थान होते. ६०० वर्षे जुने संस्थान अनेक स्थित्यंतरांना सामोरे गेल्यानंतर १९४७ मध्ये भारतीय संघराज्यात विलीन झाले.