पहिली ते १२वीपर्यंतचे वर्ग खुले होणार
अखेर महाराष्ट्रातील शाळा व ज्युनियर महाविद्यालयांना मुहूर्त सापडला आहे. येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते १२ वीपर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. पहिली ते पाचवीपर्यंतचेच वर्ग सुरू करायचे का, याविषयी चर्चा होती पण अखेर बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा-ज्युनियर महाविद्यालये उघडण्याविषयी निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या की, प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय.
याआधी, राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात ८ वी ते १२ पर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता सरसकट पहिली ते १२ वीपर्यंतच्या मुलांना शाळांमध्ये जाता येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे.
गेली दोन वर्षे शाळा कोरोनामुळे बंद असून आता शाळा उघडणार असल्यामुळे सर्व प्रकारची काळजी घेऊन शाळा सुरू केल्या जाणार आहेत, असे शिक्षणमंत्री गायकवाड यांनी सांगितले. टास्क फोर्सनेही शाळा सुरू करण्यासंदर्भात मान्यता दिली असून त्या आधारावर हा निर्णय घेतला गेला आहे.
हे ही वाचा:
विरोधकांचा मारा थोपविण्यासाठी राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत
शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार
परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
शाळा सुरू करण्यासंदर्भातील जुन्या नियमांनुसार शिक्षकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. शाळांच्या ठिकाणी पालकांना गर्दी करण्याची मुभा नसेल. मुलांकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्क, स्वच्छता याची काळजी घेतली जात आहे अथवा नाही, हे पाहिले जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास शाळा बंद ठेवून शाळेचे निर्जंतुकीकरण केले जाईल.