विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पुन्हा शाळा सुरू

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव ठेवला होता. यामध्ये सोमवारपासून शाळा सुरु करण्यात याव्यात अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. याबाबतीत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिली आहे. सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी गुरुवारी, २० जानेवारी रोजी सांगितले.

वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजमाध्याद्वारे अनेकांकडून शाळा सुरू करण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी येत होती. त्यामुळे अनेक स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी असेल अशा स्थानिक पातळीवरील सीईओ, कलेक्टर किंवा आयुक्तांना शाळा सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सोमवारपासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू होणार असल्याचे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पालकांची समंती असल्यानंतर विद्यार्थी शाळेत येतील. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी आम्ही घेत आहोत. शाळा सुरु करण्याबाबत जारी करण्यात आलेली नियमावली जिथे पाळली जाईल तिथेच शाळा सुरु होतील, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या. विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून ऑनलाईन शिक्षण देखील सुरु ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आला होता. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

गोवा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली यादी जाहीर; उत्पल पर्रीकरांना दिले पर्याय

‘१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी पाकिस्तानचे होते पाहुणे’

कुरापती चीनने भारतीय हद्दीतून १७ वर्षीय मुलाचे केले अपहरण

‘भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाईट्स आणि युट्यूब चॅनलवर टाळे’

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याच्या कारणाने राज्यातील शाळा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली होती.

Exit mobile version