राज्यासह मुंबईत पावसाने कालपासून दमदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट तर पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने गुरुवार, १४ जुलै रोजी मुंबई, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे काही जिल्ह्यातील शाळा खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आल्या आहेत. अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या बुधवारी होणाऱ्या सर्व परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करणार आहे, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
ठाण्यामधील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना गुरुवार, १४ जुलै आणि शुक्रवार, १५ जुलै अशी दोन दिवसांची सुटी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राजेश नार्वेकर यांनी जाहीर केली आहे. पालघर जिल्ह्यातील शाळांनाही रेड अलर्टनंतर सुट्टी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अध्यक्ष राजपक्षे यांच्या पलायनानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू
मुख्यमंत्री शिंदेंकडून वसई दुर्घटनेतील मृतांना ६ लाखांची मदत जाहीर
मुंबई महानगर क्षेत्रातील पहिले इको- टुरिझम गाव विरारमध्ये!
धक्कादायक! एकाच कुटुंबातील तिघे गेले वाहून
आपात्कालीन परिस्थितीत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण उपसंचालकांनी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार मुंबईतील काही शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.