येत्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून ‘समतोल फाऊंडेशन’ ही संस्था अनोखा उपक्रम सुरु करणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहरात येणाऱ्या अनेकांची मुले शिक्षणापासून वंचित राहतात. त्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून या संस्थेने ‘बस गाडीमध्ये शाळा’ (स्कूल इन बस) हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्याआधी संस्थेने एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणानुसार, कल्याण, भिवंडी, मुरबाड तालुक्यात ७० हुन अधिक वीटभट्ट्या आहेत. या भट्ट्यांमध्ये विटा बनवण्यासाठी शकडो कुटुंब काम करतात. त्यामुळे या कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अनौचारिक पद्धतीने का होईना पण या मुलांना शिक्षण घेता यावे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
राज्यातील ठाणे जिल्ह्याचा नागरीकरणाचा वेग सर्वाधिक असून, येथे गृहनिर्माण उद्योग मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. या बांधकामासाठी लागणाऱ्या विटा तयार करण्यासाठी अनेक ठिकाणी वीटभट्ट्या आहेत. वीटभट्टीलगतच झोपड्या बांधून ही कुटुंबे राहतात. या कुटुंबपर्यंत अंगणवाडी सेविका, आशा सेविका असे कोणतेही शासकीय प्रतिनिधी पोहचू शकत नाहीत. या कुटुंबातील लहान मुलांना त्यामुळे पोषक आहारही मिळत नाही. त्यामुळे ही मूले शिक्षणापासून वंचित राहतात. त्या मुलांना शिक्षण मिळावे हाच उद्देश ठेवून बसमध्ये शाळा भरवण्याचा निर्णय ‘समतोल फाऊंडेशन’ ने घेतला आहे.
बसमध्ये खिडक्यांच्या काचेवर अंकलिपी, बाराखडी, मुळाक्षरे लावलेली असून बसमध्ये फलक, ध्वनिक्षेपण यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या बसमध्ये एका वेळी २५ ते ३० विध्यार्थी बसू शकतात. या बसशाळेत दोन शिक्षिका, एक समाजसेविका असणार आहेत. या बसशाळेत मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. शिवाय दररोज खाऊही दिला जाणार आहे. साधारणपणे दोन ते तीन वीटभट्ट्यांची मुले एकत्रितपणे येऊ शकतील, अशा सोयीच्या ठिकाणी ही शाळा बस जाईल, अशी माहिती समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव यांनी दिली.
हे ही वाचा:
श्रीलंकेत आर्थिक संकटाचा निषेध; राजधानी कोलंबोत कर्फ्यू
किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर; अनिल परबांनंतर हसन मुश्रीफ यांचा नंबर
‘श्रेयवादाच्या नादात अपयशाचं खापर ठाकरे सरकारवर फुटेल’
‘गरीब नवाज चाहे तो हिंदुस्तान का पता ना चले’…कव्वाली गायक नवाज शरीफची मुक्ताफळे! गुन्हा दाखल
२००४ पासून समतोल फाऊंडेशन ही देशातील घर सोडून मुंबईत येणाऱ्या आणि रेल्वे स्थानक परिसरात मिळेल ते काम करून राहणाऱ्या किशोरवयीन मुलांचे समुपदेशन करण्याचे काम करत आहे. गेल्या १८ वर्षांपासून या संस्थेने देशातील तब्बल १८ हजार मुलांचे समुपदेशन करून त्यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द केले आहे.