संतापजनक ! शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा निकाल रोखला!

संतापजनक ! शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचा निकाल रोखला!

चेंबूर येथील कर्नाटक हायस्कूल या शाळेने शुल्क न भरल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल आणि शाळा सोडल्याचा दाखला अडवून ठेवल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे या शाळेच्या पालकांना शाळेविरुद्ध आंदोलनाचा पर्याय निवडावा लागला आहे. कोरोनाकाळात अनेक पालकांवर आर्थिक संकट कोसळल्याने शाळा आणि पालक यांच्यामध्ये शुल्कावरून वाद सुरू झाले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २०२१- २२ मध्ये शाळांना शुल्क कपात करण्याचे आदेश दिले.

शाळेचे शुल्क न भरल्यामुळे शाळेने दहावीच्या काही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि दाखले अडवून ठेवले होते. या विरोधात पालक आणि लोकजागृती सामाजिक प्रतिष्ठानाच्या स्वाती पाटील यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. कर्नाटक हायस्कूलने इतर खर्चासाठी म्हणून अडीच हजार रुपये शुल्क आकारले होते. तसेच दोन वर्षापूर्वी प्रोजेक्टर घेण्याच्या उद्देशाने साडेचार हजार रुपये घेतले होते. विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी म्हणून पालकांनी हे शुल्क भरले. मात्र नंतर ते शुल्क पूर्ववत केले नसून आजही पालकांकडून तितकेच शुल्क आकारले जात आहे, असे स्वाती पाटील यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले.

हे ही वाचा:

मविआ सरकारने केली लोकशाहीची क्रूर हत्या

ठाणे: शिवसेना महापौरच म्हणतात ‘नारायण राणे अंगार है!’

आम्ही अशा कारवाईला घाबरत नाही! – जे.पी.नड्डा

हे आहे नवे हिंदूत्त्व आणि असा आहे नवा महाराष्ट्र!!!

शुल्क कपातीसाठी पालकांनी वारंवार विनंती करूनही शाळेकडून सीसीटीव्ही, हाऊस कीपिंग अशा बाबींसाठी शुल्क आकारले जात आहे. काही विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने ज्यांना शुल्क भरणे शक्य झाले नाही त्या विद्यार्थ्यांचे निकाल आणि दाखले शाळेने अडवून ठेवले आहेत. शुल्कासाठी विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये, असे निर्देश कर्नाटक हायस्कूलच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत अशी सूचना केली आहे, असे उत्तर विभागाचे प्रभारी शिक्षण निरीक्षक देविदास महाजन यांनी सांगितले.

सरकारने शासन निर्णय देऊन १५ टक्के शुल्क कपातीचे आदेश देऊनही अनेक शाळा या नियमाचे पालन करत नाहीत. अशा शाळांवर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर आणि मनसे विभाग अध्यक्ष धनराज नाईक यांनी शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Exit mobile version