फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे निधन

वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

फुले साहित्याचे अभ्यासक प्रा. हरी नरके यांचे निधन

सुप्रसिद्ध ज्येष्ठ लेखक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी बुधवार, ९ ऑगस्ट रोजी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून हरी नरके यांची विशेष ओळख होती. तत्कालीन पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले होते. महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

हरी नरके यांनी विपुल लेखन केले असून महात्मा फुले- शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी: एक सत्यशोधन ही त्यांची काही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत ५४ पुस्तकांचे लेखन आणि संपादन केलं आहे.फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहीत होते. सोशल मीडियावरही सक्रीय होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं.

हे ही वाचा:

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या आठ युट्युब चॅनल्सवर बंदी

युती ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही

अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत नरके यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. मराठी लेखक, अभ्यासू संशोधक, वक्ते आणि मराठी ब्लॉगर प्रो. हरी रामचंद्र नरके यांचे दुःखद निधन झाले. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यापनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. त्यांच्या निधनाने एक ज्वलंत अभ्यासू व्यक्तिमत्व गमावले, अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Exit mobile version