सर्वोच्च न्यायालयाने आज ज्ञानवापी मशिदीच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालानुसार सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील फैसला करण्याचे आदेश जिल्हा सत्र न्यायालयाला दिले आहेत. पण तसे असले तरी देखील मशिदीत सुरू असलेल्या सर्वे मधील ठराविक माहिती माध्यमांमध्ये बाहेर येत असल्यावरूनही सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
शनिवार, २० मे रोजी या प्रकरणातील निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हे नमूद केले की समितीच्या अहवालातील ठराविक गोष्टी माध्यमांमध्ये लिक होणे थांबले पाहिजे. या प्रकरणात निकाल देणाऱ्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठातील जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी हे नमूद केले. समितीचा अहवाल तयार झाल्यानंतर तो न्यायालयात सादर झाला पाहिजे. माध्यमांमध्ये गोष्टी लिक होता कामा नयेत. अहवाल तयार झाल्यावर तो न्यायाधीशांना सादर करावा असे चंद्रचूड यांनी म्हटले आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यासोबत न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह हे या प्रकरणात न्यायाधीश म्हणून काम पाहत होते.
हे ही वाचा:
२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
‘राजकारणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या कबरीवर फुले उधळतील’
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला
मशीद समितीच्या बाजूने न्यायालयात दावा करण्यात आला की माध्यमांमध्ये अहवालातील ठराविक बाबी लिक केल्या जात आहेत. ज्यामुळे एक विशिष्ट नरेटिव्ह तयार व्हायला मदत होत आहे. यावरूनच न्यायालयाने अहवालातील बाबी लिक होऊ नयेत असे स्पष्टपणे सांगितले. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात आज ज्ञानवापी मशिदी संदर्भातील महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानेच निकाल द्यावा असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे ज्ञानवापी मशिदीत व्हिडिओग्राफीसह होणाऱ्या सर्वेला आता सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील मिळाला असे म्हटले जात आहे.