मोठ्या प्रतीक्षेनंतर मान्सून भारतात दाखल झाला असून पाऊस आणि खराब हवामानामुळे रविवारी अनेक विमानांची उड्डाणं उशिराने झाली तर काही ठिकाणी विमानांचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विशेष करून दिल्ली विमानतळावरून विमानांची उड्डाणं करण्यात आणि आलेली विमानं उतरवण्यात खूप अडचणी येत होत्या. दरम्यान, एअर इंडिया विमानात एक अजबचं घटना घडली. लंडनहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान एआय- ११२ खराब हवामानामुळे दिल्लीत न उतरवता जयपूरमध्ये उतरवण्यात आलं. मात्र, पुढे हे विमान जयपूरहून दिल्लीला नेण्यास वैमानिकाने नकार दिल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
रविवारी पावसाच्या जोरदार हजेरीमुळे परदेशातून दिल्लीला येणारी, तसेच अनेक देशांतर्गत विमानं जयपूरला डायव्हर्ट करण्यात आली होती. त्यावेळी एअर इंडियाचे विमान एआय- ११२ हे सुद्धा जयपूरला रवाना करण्यात आले. दोन तासांनी हवामान सुधारलं. त्यानंतर दिल्ली विमानतळ प्रशासनाने क्लिअरन्स दिला. लँडिंग क्लिअरन्स मिळाल्यानंतर जयपूरला उतरवण्यात आलेली विमानं एकापाठोपाठ एक दिल्लीच्या दिशेने रवाना करण्यात आली. परंतु, लंडनहून दिल्लीला येणारं विमान तीन तास झाले तरी दिल्लीच्या दिशेने रवाना झालं नव्हतं. त्याच कारण म्हणजे पायलटने विमानाचं उड्डाण करण्यास नकार दिला.
आपली ड्युटी संपली आहे, असं म्हणत वैमानिकाने विमान उडवण्यास नकार दिला. तसेच एवढं बोलून हा पायलट विमानातून उतरला. पायलटच्या या निर्णयामुळे सकाळी ४ वाजता दिल्लीला पोहचणारं विमान अनेक तास उलटले तरी जयपूर विमानतळावरच ताटकळत उभं होतं. अखेर विमानातील काही प्रवाशांना बसने दिल्लीला पाठवण्यात आलं. तर, विमान दिल्लीला पोहोचवण्यासाठी दुसऱ्या क्रू मेंबर्सची व्यवस्था करण्यात आली. नंतर उरलेल्या प्रवशांना घेऊन काही तासांनी विमान जयपूरहून दिल्लीला आलं.
हे ही वाचा:
आफ्रिकी-युरोपीय बाजारात भारताच्या व्यापाराचा वाजणार डंका
कमी उंचीमुळे मुलींचा नकार येत होता म्हणून त्याने खर्च केले ६६ लाख
जैन मंदिरात आता जीन्स, हाफ पँट, फ्रॉक किंवा फाटलेले कपडे बंद
नियंत्रण रेषेजवळ पायाभूत सुविधा उभारायला चीनची पाकिस्तानला मदत
एअर इंडियाने काय म्हटलं?
दरम्यान, एअर इंडियाने त्यांच्या अधिकृत निवेदनाद्वारे सांगितलं की, लंडनहून येणारं एआय-११२ हे विमान सकाळी ४ वाजता दिल्लीला उतरवणं अपेक्षित होतं. परंतु, खराब हवामानामुळे ते जयपूरला डायव्हर्ट करण्यात आलं. हवामान सुधारण्यास खूप वेळ लागला. त्यादरम्यान कॉकपिट चालक दलाचा ड्युटी डाईम लिमिटेशन (FDTL) अवधी संपला होता. वैमानिक किती वेळ विमान चालवू शकतो याची एक मर्यादा असते. हा वैमानिक लंडनहून विमान घेऊन आला होता. त्यानंतर काही तास तो जयपूरमध्येही वाट पाहत होता. तसेच नियामक प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या एफडीटीएलअंतर्गत त्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर वैमानिक विमान चालवू शकत नाहीत. एअर इंडिया कंपनी त्यांचे प्रवाशी आणि पायलटसह क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देते. तसेच विमान संचालनाच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करतो. त्यामुळेच आम्ही त्या विमानाच्या उड्डाणासाठी तातडीने नव्या क्रूची व्यवस्था केली.